BIG BREAKING | शरद पवार यांनी कार्यकर्त्यांकडे दोन ते तीन दिवस मागितले, राजीनामा मागे घेणार?
शरद पवार यांचा निरोप घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते वाय. बी. चव्हाण सेंटर येथे परत आले. यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांचा निरोप कार्यकर्त्यांना सांगितला.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपल्या पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आज त्यांच्या ‘लोक माझ्या सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात राजीनाम्याची घोषणा केली. त्यांच्या राजीनाम्याच्या निर्णयाविरोधात कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले. या घडामोडींदरम्यान शरद पवार आपल्या सिल्व्हर ओक येथील निवासस्थानी गेले. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्व दिग्गज नेते सिल्व्हर ओकला गेले. तिथे त्यांची शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली. त्यानंतर शरद पवार यांचा निरोप घेऊन हे सर्व नेते वाय. बी. चव्हाण सेंटर येथे परत आले. यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांचा निरोप कार्यकर्त्यांना सांगितला.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
“माझी हात जोडून विनंती आहे. गप्प बसा. आज 11 वाजता आपला जो कार्यक्रम होता त्यासाठी सर्व कार्यकर्ते आले होते. या कार्यक्रमावेळी शरद पवार असं बोलतील असं वाटलं नव्हतं. त्यांचा तो निर्णय आपल्या सगळ्यांसाठी धक्का आहे. त्यांच्या निर्णयाविरोधात तुम्ही ठिय्या मांडला. तो तुमचा अधिकार आहे. शरद पवार यांनी ऐकून घेतलं. त्यांनतर शरद पवार सिल्व्हर ओकला गेले”, असं अजित पवार कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.
“शरद पवार यांच्यानंतर आम्ही सिल्व्हर ओकला गेलो. सर्वांची इच्छा आहे. मी निरोप दिलेला. त्यांनी मला रोहित पवार, भुजबळ यांना सांगितलं की, माझा निरोप द्या. तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर मला दोन ते तीन दिवस विचार करायला लागतील. आपलं दैवतच म्हणतंय की दोन ते तीन दिवस द्या. मात्र, ते म्हणाले की, मी विचार तेव्हाच करेन सर्व कार्यकर्ते आपापल्या घरी जातील. जे पदाधिकारी राजीनामा देत आहेत त्यांनी मागे घ्यावा. तरंच मी निर्णय घेईन, असं शरद पवार यांनी सांगितलंय”, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
“इथे कुणी बसलेलं दिसायला नको. त्यांनाही देशातून राज्यातून फोन येत आहेत. ते म्हणाले की मला दोन-तीन दिवस लागतील. मी तुमचं भावनिक बोललेलं ऐकलेलं आहे. अनेकांनी आपापली भूमिका मांडली. या गोष्टी त्यांनी गांभीर्याने घेतल्या आहेत. सुप्रिया सुळेला बाजूला घेऊनही बोलले”, असं अजित पवार यांनी सांगितलं.
“पवार साहेबांनी परिवारातील जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे. कार्यकर्त्यांनी हट्टीपणा सोडावा. ते म्हटले, तुम्ही हट्टी आहेत ना मग तुम्ही माझेच कार्यकर्ते आहात. मी डबल हट्टी. राजीनामा मागे घेणारच नाहीत. अरे बाबा तुम्ही थांबाना. आमच्या कार्यकर्त्यांशी बोलूद्या. आम्ही ज्यांच्या जीवावर उभे आहोत त्यांच्याशी बोलतो”, असं अजित पवार यावेळी माध्यमांना म्हणाले.
दिवसभरात काय-काय घडलं?
शरद पवार यांच्या ‘लोक माझ्या संगाती’ या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी ही मोठी घोषणा केली. त्यांच्या या घोषनेनंतर राष्ट्रवादी पक्षात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. विशेष म्हणजे पवारांच्या राजीनाम्याच्या घोषणेच्या विरोधात कार्यकर्त्यांनी भर सभागृहात ठिय्या मांडला. तुम्ही राजीनामाचा निर्णय मागे घ्या, अशी विनंती कार्यकर्ते करत होते.
या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शरद पवार यांच्या निर्णयाचं स्वागत केलं. पण इतर नेत्यांनी दु:ख व्यक्त केलं. जयंत पाटील तर अक्षरश: रडले. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना रडू कोसळलं. अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं. आम्ही राजीनामा देतो पण आपण राजीनामा देऊ नका, अशी विनंती जयंत पाटील यांनी यावेळी केली. आपल्या नेत्यांची अस्वस्था पाहून कार्यकर्तेही भावूक झाले. त्यांनी शरद पवारांना राजीनामा मागे घ्यावा, यासाठी विनंती केली. या विनंतीसाठी त्यांनी आंदोलनही पुकारलं.
कार्यकर्ते आक्रमक
कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना सभागृबाहेर जाण्यास मज्जाव केला. शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्याशिवाय आपण त्यांना सभागृहाबाहेर जाऊ देणार नाही, असं आक्रमक कार्यकर्ते अधिकारवाणीने म्हणाले. यावेळी अजित पवार यांच्यासह इतर नेत्यांनी कार्यकर्त्यांना शांत होण्याचा सल्ला दिला. अजित पवार यांनी आपण शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक येथील निवासस्थानी जाऊन त्यांची समजूत काढू. तुम्हाला अपेक्षित असाच मार्ग काढला जाईल, असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं. तरीही कार्यकर्ते तिथून हटायला तयार नव्हते.
यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना आपल्या कडक शब्दांमध्ये शांत राहण्याचं आवाहन केलं. त्यानंतर शरद पवार यांना सभागृहाच्या बाहेर जाण्यासाठी रस्ता करण्यात आला. शरद पवार सभागृहाबाहेर जात असताना कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली असल्याचं सांगून जेवणाचं आवाहन करण्यात आलं. तसेच सभागृहात दुसऱ्या संस्थेचा कार्यक्रम असल्याने सभागृह सोडून जाण्यास आवाहन करण्यात आलं.
सुप्रिया सुळे यांचा शरद पवार यांना फोन
या दरम्यान शरद पवार सिल्व्हर ओकला निघून गेले. तर इतर दिग्गज नेत्यांची वाय.बी.चव्हाण सेंटर येथे बैठक पार पडली. तर कार्यकर्ते बाय.बी. चव्हाण सेंटरबाहेर आंदोलन करत होती. वाय.बी.चव्हाण सेंटर येथील भेट आटोपून सुप्रिया सुळे आणि अजित पवार बाहेर आले तेव्हा त्यांनी कार्यकर्त्यांना जेवण करण्याचं आवाहन केलं. पण कार्यकर्ते ऐकून घेण्याच्या अवस्थेत नव्हते.
कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहून सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना फोन केला. यावेळी शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना जेवण करण्याचं आवाहन केलं. पण कार्यकर्ते ऐकून घेण्याच्या मनस्थित नव्हते. यावेळी कार्यकर्ते, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात संभाषण झालं. पण आंदोलकांनी आपलं आंदोलन मागे घेतलं नाही.
सिल्व्हर ओकवर बैठक
या सगळ्या घडामोडींनंतर राष्ट्रवादीच्या सर्व दिग्गज नेत्यांची सिल्व्हर ओकवर शरद पवार यांच्याशी बैठक पार पडली. या बैठकीसाठी शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह सर्व दिग्गज नेते सिल्व्हर ओकवर गेले. तिथे बैठक पार पडल्यानंतर अजित पवार आणि इतर नेते वाय. बी. चव्हाण सेंटर येथे आले. त्यांनी कार्यकर्त्यांना शरद पवार यांचा निरोप दिला.