BREAKING अजित पवारांचा आमदारकीचा राजीनामा
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar resigns ) यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar resigns ) यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांचा (Ajit Pawar resigns ) राजीनामा मंजूर केला आहे. अजित पवारांचा राजीनामा मंजूर केल्याची माहिती हरिभाऊ बागडे यांनी टीव्ही 9 मराठीला दिली. (अपडेट बातमीसाठी रिफ्रेश करा)
अजित पवार यांनी राजीनामा का दिला याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरपर्यंत आहे. मात्र त्याआधीच अजित पवारांनी राजीनामा दिला.
अजित पवार यांनी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मुंबई येथील कार्यालयात त्यांनी तो सूपूर्द केला होता. त्या कार्यलयाने बागडे यांना तो मेलद्वारे पाठविला. अजित पवार हे बागडे यांच्याशी फोनवरुन बोलले आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. याबाबत बागडे यांनी हा राजीनामा स्वीकारल्याचे सांगितले. अजित पवार माझ्याशी फोनवर बोलल्याने तो मंजूर केला. राजीनामा आमच्या नेहमीच्या फाॅरर्मटमध्ये तो आला असल्याने, राजीनामा स्वीकारला असल्याचे बागडे यांनी सांगितले.
“राष्ट्रवादीच्या बाजूने उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र त्या उत्साहाला ब्रेक लावणारी ही घटना आहे. पण अजित पवारांचा राजीनामा मुदत संपत आल्याने या राजीनाम्याला तूर्तास अर्थ नाही”, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी दिली.
5 मिनिटात राजीनामा
राजीनामा देण्यासाठी अजित पवार एकटे विधानभवनात गेले. अवघ्या पाच मिनिटात विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयात राजीनामा दिला. पाच मिनिटात तिथून थेट पुण्याकडे रवाना झाले, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. सर्व नेते शरद पवारांच्या घरी सिल्वर ओकला असताना, अजित पवार राजीनामा देऊन गेले, पवारांच्या घराकडे ते फिरकलेच नाहीत.
राजीनाम्याबाबत शरद पवारही अनभिज्ञ
अजित पवारांनी राजीनामा दिला असला तरी त्याची माहिती पक्षाध्यक्ष शरद पवार यांनाही नाही, अशीही माहिती समोर येत आहे. ज्या अर्थी शरद पवारांना माहिती नाही, त्या अर्थी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही अजित पवारांच्या राजीनाम्याची माहिती असेल, याबाबत शंका आहे.
पत्नी-मुलांनाही माहिती नाही
अजित पवार यांच्या राजीनाम्याबद्दल शरद पवार जसे अनभिज्ञ आहेत, तसेच त्यांचे कुटुंबीयही अनभिज्ञ आहेत. अजित पवार यांच्या राजीनाम्यावेळी चिरंजीव जय पवार बारामतीत पूरग्रस्त भागाची पाहणी करत होते. तर पत्नी सुनेत्रा पवार याही बारामतीत होत्या.
शरद पवारांची पुण्यात पत्रकार परिषद
दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी पुण्यात पोहोचले आहेत. रात्री 8 च्या सुमारास ते पत्रकार परिषद घेणार आहेत.
गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया
अजित पवारांनी राजीनामा का दिला हे मलाही कळत नाही. त्यांच्यात घरातले वाद आहेत की पक्षातले वाद आहेत का, हे तेच सांगू शकतील. आताच निवडणुकीचे फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे. अजित पवार साताऱ्यातूनही लोकसभा लढवण्याची शक्यता कमी आहे. जरी ते लढणार असतील तरी आमदारकीच्या राजीनाम्याची गरज नाही. पण खरं कारण तेच सांगू शकतात. अजितदादा माझ्या संपर्कात नाहीत, ना मी त्यांच्या संपर्कात. त्यांना पक्षात घेण्याचाही प्रश्न नाही. पक्षांतर्गत किंवा कौटुंबीक कुरघोड्या आहेत की ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे, हे सांगू शकत नाही. हा विषय संभ्रमात टाकणारा आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिली.
राष्ट्रवादीतील लक्षणीय घटना
- अजित पवार यांचं नाव राज्य सहकार बँक घोटाळ्यात असून, त्यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे.
- शरद पवार आणि अजित पवार यांच्यात अनेकदा मतभेत समोर आले. ईव्हीएमच्या मुद्द्यावर दोघांमध्ये सर्वात मोठा मतभेद समोर आला होता.
- केंद्र सरकारने कलम 370 काढल्यानंतर पवारांनी त्याचा विरोध केला होता, तर अजित पवारांनी समर्थन केलं होतं.
- सभांमध्ये यापुढे राष्ट्रवादीच्या झेंड्यासोबत भगवाही दिसेल असं अजित पवार म्हणाले होते, मात्र शरद पवारांनी त्यालाही विरोध केला होता
- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.
- लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा पराभव झाला