दांदावर दादा नाराज, अजित पवारांसमोर असं काय म्हणाले चंद्रकांत पाटील
महायुतीतल्या एका दादांवर दुसरे दादा नाराज झाल्याची माहिती समोर आलीये. चंद्रकांत पाटलांनी बारामतीत शरद पवारांबद्दल जे विधान केलं, त्यावरुन विरोधकांना टीकेची आयती संधी मिळालीये. त्यावरुनच अजित पवारांनी महायुतीच्या समन्वयक बैठकीत चंद्रकांत पाटलांच्या विधानाबद्दल नाराजी वर्तवल्याची माहिती आहे.
Dada vs Dada : बारामती लोकसभा प्रचारात भाजप नेते चंद्रकांत पाटलांच्या केलेल्या या विधानावर अजित पवार नाराज असल्याचं समोर आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार महायुतीच्या समन्वय बैठकीत चंद्रकांत पाटलांसमोरच अजित पवारांनी नाराजी व्यक्त केलीये. सूत्रांनुसार हल्ली कुणाला भाषणाला बोलवायलाही मनात भीती वाटते असं मत अजित पवारांनी व्यक्त केलंय. प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात बारामतीत जावून आम्हाला फक्त शरद पवारांचा पराभव हवा आहे. राजकीय तराजूनं मोजमाप केल्यास शरद पवारांचा तराजू जास्त वजनदार वाटतो. त्यामुळेच त्यांचा पराभव भाजपसाठी महत्वाचा असल्याचं विधान चंद्रकांत पाटलांनी केलं होतं. नंतर याच विधानावरुन विरोधक आक्रमक झाले. तर महायुतीनं यातून सारवासारव म्हणून बारामतीची लढाई पवार विरुद्ध पवार नसून मोदी विरुद्ध राहुल गांधींमध्ये असल्याचा प्रचार केला.
चंद्रकांत पाटलांचंच नव्हे तर आता सम्शानभूमीत जातानाच तुतारी वाजणार, प्रचारावेळी फोडलेलं मटकं, भटकती आत्मा त्यानंतर बारामतीवरुन दत्ता भरणेंनी केलेलं विधान या मुद्द्यावरुन सत्ताधारी-विरोधक आमने-सामने आलेत.
दुसरीकडे मतदानाच्या आदल्या दिवशी पुणे जिल्हा बँक रात्री दीडपर्यंत सुरु असल्याचा व्हिडीओ रोहित पवारांनी ट्विट केला. त्यावर तो व्हिडीओ खरोखर त्याच दिवसाचा आहे का म्हणत अजित पवारांनी शंका व्यक्त केली. मात्र प्रत्यक्ष पाहणीनंतर निवडणूक भरारी पथकानंच मतदानाच्या आदल्याच दिवशी बँक सुरु होती म्हणून मॅनेजरविरोधात गुन्हा दाखल केलाय.
रात्री दीडपर्यंत बँक सुरु ठेवण्यामागे पैसे वाटण्याचा हेतू असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता. त्यांनी सोशल मीडियात व्हिडीओ टाकल्यानंतर निवडणूक भरारी पथक बँकेत पोहोचलं. बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर त्यात 40 ते 50 जण बँकेत आढळून आले. त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत बँक सुरु ठेवून आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. अजून चार टप्प्यातील मतदान बाकी आहे. त्याआधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपली आहे. दोन्ही बाजुने जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. महायुती आणि महाविकासाआघाडी यांच्यात हा सामना होत आहे.