अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, विधानसभा निवडणुकीआधी काय घडतंय?
जागा वाटपावरुन अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अंतर्गत बैठक झाली, ज्यात जागांवरुन रणनिती ठरल्याचं कळतंय. पण महायुतीत अजित दादांच्या राष्ट्रवादीला 60 पेक्षा किती जागा अधिक मिळणार?, यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झालीय.
जागा वाटपावरुन अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अंतर्गत बैठक झाली. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी, अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांच्यामध्ये किती जागांवर उमेदवार देवू शकतो, यावरुन खलबतं झाली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीत 60-65 मिळणार असल्याचं कळतंय. तर अजित पवारांची राष्ट्रवादी 70 पेक्षा अधिक जागांवर लढण्यास ठाम असल्याची माहिती आहे. 2 दिवसांआधीच, अजित पवारांनी 60 जागांवर कामाला लागण्याच्या सूचना पदाधिकारी आणि नेत्यांना केल्या होत्या.
मात्र अजित दादांच्या त्या वक्तव्याचा अर्थ वेगळा काढण्यात आला. 2019 मध्ये निवडून आलेले राष्ट्रवादीच्या आमदारांचा 54 आकडा आणि इतर 6 असा तो 60 चा आकडा अजित दादांनी सांगितल्याचं तटकरेंचं म्हणणं आहे. या 60 जागांसह इतर ठिकाणीही लढणार, असं सुनील तटकरेंनी सांगितलं आहे. “आमची एकूण संख्या 60 असं दादा बोलले, 60 पेक्षा अधिक जागा लढणार”, असं सुनील तटकरे म्हणाले. “प्रत्येक पक्ष जागा मागतात, तीनही नेते ठरवतील”, अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी दिली.
जागा वाटपावरुन आतापर्यंत अजित पवारांच्या इतर नेत्यांसोबत दोनदा बैठका झाल्या आहेत. नागपुरात शनिवारी साडे 4 तास तिघांची बैठक झाली. ज्यात सीटिंग आमदारांच्या जागांसह, निवडून येईल त्याची जागा असा फॉर्म्युला निश्चित झालाय.
भाजपनं मिशन 125 साठी 150 जागा लढायच्याच हे निश्चित केल्याचं समजतंय. तर, इकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्वत: अजित पवारांनीच 90 जागांवर लढणार असल्यांचं महायुतीत येताच जाहीर केलं होतं. मंत्री छगन भुजबळ यांनी 90 जागांची मागणी केलेली आहे. मात्र महायुतीतल्या सध्याच्या राजकीय समीकरणानुसार 90 जागा अजित दादांच्या राष्ट्रवादीला मिळण्याच्या शक्यता कमी आहे. कारण 288 पैकी भाजपनं जर 150 जागा लढल्या तर 138 जागा शिल्लक राहतात. त्यात 90 जागा अजित पवारांना दिल्या तर शिंदेंच्या शिवसेनेसाठी 48 जागाच उरतात.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 65 जागा दिल्या तर शिंदेंना 73 जागा मिळू शकतात. अजित पवारांवर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते कितीही तुटून पडले. तरी ते महायुतीत राहणार आणि लढणार हे भाजपनं वारंवार स्पष्ट केलंय. मात्र त्यासाठी समाधानकारक तोडगा भाजपलाच काढावा लागेल.