‘4 दिवस सासूचे संपले, आता सूनेचे 4 दिवस’, अजित पवारांचा काकांना जोरदार टोला
शरद पवार यांच्या वक्तव्यावर अजित पवार यांनी आज पुन्हा टीका केली आहे. त्यांनी शरद पवार यांना जोरदार टोला लगावला आहे. चार दिवस सासूचे संपले, आता चार दिवस सूनेचे येऊद्या, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एकच हास्यकल्लोळ झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार कुटुंबातील वाकयुद्ध काही केल्या संपताना दिसत नाही. विशेष म्हणजे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी काल आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतल्याचं स्पष्ट केलं. आपण तसं बोललोच नाही, असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलं. पण त्यानंतरही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांना आज जोरदार टोला लगावला. 4 दिवस सासूचे संपले, आता सुनेचे 4 दिवस येऊद्या, असा टोला अजित पवारांनी लगावला आहे. 40 वर्ष झाली तरी बाहेरचे म्हणत आहेत, असाही जोरदार टोला अजित पवारांनी शरद पवार यांना लगावला आहे.
“ही वडीलधारी जरा, जुना काळ आठवत असेल, तर त्यांना म्हणा, जुना काळ आता थोडा बाजूला ठेवा. आता नवीन काळ बघा. आता सासूचे चार दिवस संपले, आता सूनेचे चार दिवस येऊद्या, असं सांगाना. की फक्त सासू-सासू-सासू, मग सुनेनं फक्त बघत बसायचं? बाहेरची-बाहेरची-बाहेरची, असं कुठं असतं का राव? असतं का? आपण घरची लक्ष्मी म्हणून त्यांच्याकडे बघतो. 40 वर्षे झाली तरी बाहेरची? किती वर्ष झाले मग घरची? सांगा आई बहिणीनों, बघा बाबा आता” अशा शब्दांत अजित पवारांनी शरद पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
शरद पवारांचं स्पष्टीकरण काय?
“मी तसं बोललेलो नव्हतो. मी जे बोललो होतो, पत्रकाराने विचारलं, अजित पवार यांनी काही भाषण केलं होतं. त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलं की, जनतेनं मला निवडून दिलं. त्यांना स्वत:ला निवडून दिलं, ताईला निवडून दिलं, आता सूनेला निवडून द्या. त्यापुढे त्यांनी आणखी काही वाक्य वापरलं. त्याच्या संबंधित मी फक्त स्पष्टीकरण केलं. यापेक्षा वेगळा काही अर्थ काढण्याची गरज नाही”, असं स्पष्टीकरण शरद पवारांनी काल केलं होतं.
दोन्ही पवारांमध्ये संघर्ष
अजित पवार यांनी गेल्यावर्षी वेगळा निर्णय घेतला. त्यांनी शरद पवार यांना सोडून सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या 40 आमदारांनी पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. राष्ट्रवादीच्या दोन गटातील ही लढाई निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात पोहोचली. निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह बहाल केलं. तर सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी घेण्याचे आदेश दिले.
विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणात सुनावणी घेतली. त्यांनीदेखील अजित पवार गटाला दिलासा दिला. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात आता सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. असं असताना लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. शरद पवार यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबातच नणंद-भावजय यांच्यात लढत आहे. त्यामुळे दोन्ही बाजने वाकयुद्ध रंगलेलं बघायला मिळत आहे.