महायुतीत अजित पवार नाराज? मध्यरात्री दिल्लीत अमित शाहांची भेट, कारण काय?
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत काय सुरु आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे. मध्यरात्री तडकाफडकी अजित पवारांनी दिल्लीत अमित शाहांची भेट घेतली आणि याभेटीनंतर फडणवीस अजित पवारांच्या भेटीला पोहोचले.
अजित पवार तडकाफडकी दिल्लीत मध्यरात्री 1 वाजता पोहोचले आणि अमित शाहांना भेटले. त्यामुळं नेमकं असं झालं की अजित पवार अमित शाहांना भेटले, यावरुन तर्कवितर्क सुरु झालेत. तर मध्यरात्रीच्या भेटीनंतर फडणवीसांनी अजित पवारांची भेट घेतली. दरम्यान रात्री दिल्लीत काय घडलं ते पाहुयात.
रात्री 1 वाजता अजित पवार अमित शाहांना दिल्लीत भेटले. अमित शाहांसोबत 40-45 मिनिटं दादांची बैठक झाली. अजित पवारांसोबत प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेलही होते. अमित शाहांच्या भेटीनंतर सकाळी 8 वाजता मुंबईत आले. मध्यरात्रीच्या या भेटीनंतर भुवया उंचावणं स्वाभाविक आहे. त्यातच गेल्या 5-6 दिवसातल्या घडामोडी पाहिल्या तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत काय हालचाली सुरु झाल्यात ?, हा प्रश्न आहेच.
अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंनी विधानसभा निवडणुकीत दादा आणि शरद पवार एकत्र येवू शकतात असं वक्तव्य केलं. अमित शाहांनी पुण्यात शरद पवारांवर भ्रष्टाचारांचा सरदार अशी टीकेवर दादांचे आमदार अण्णा बनसोडेंनी आक्षेप घेतला. अमित शाहांची शरद पवारांवरील टीका योग्य नाही, असं बनसोडे म्हणालेत. तर अजित पवार गटाचेच माजी आमदार विलास लांडेंनी शरद पवार दैवत असून चूक सुधारावी असं म्हटलं.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी मंत्री राधाकृष्ण विखे फोन घेत नसून भाजपचे 4 मंत्री कामाचे नाहीत, अशी टीका केली बुधवारी निधी वरुन मंत्री गिरीश महाजन आणि अजित पवारांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची माहिती आहे. अशा सर्व घडामोडी घडत असताना अजित पवार दिल्लीत तडकाफडकी अमित शाहांच्या भेटीला आलेत.
- अमित शाहांसोबत अचानक भेटीचं कारण काय असू शकतं,
- विधानसभेत 80-90 जागांची मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आहे, त्यावरुन चर्चा असू शकते.
- महायुतीत दादांना का घेतलं यावरुन संघाकडून टीका झालीय, ही टीका थांबवण्याची मागणी दादांनी केली असू शकते.
- अमित शाह शरद पवारांवर तुटून पडतायत, त्यावरुन दादांच्या गोटातल्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे, त्यावरुन चर्चा झाली असू शकते
- राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी विधानसभा निवडणुकीआधीच राज्यपालांना दिली जावू शकते, त्यात 2-3 जागांची मागणी दादांची आहे.
अमित शाहांसोबतच्या भेटीवरुन शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाटांनी आणखी भुवया उंचावणारं वक्तव्य केलंय. अजित पवारांच्या उठावानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे, त्यावरुन ही भेट असू शकते असं शिरसाट म्हणाले आहेत.
अमित शाह आणि अजित पवारांच्या भेटीनंतर फडणवीसांनी अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर जात 1 तास चर्चा केली. ज्यात महामंडळांच वाटप अद्याप न झाल्यामुळे अजितदादांची नाराजी आहे. मंत्रिमंडळ आणि महामंडळ वाटप होत नसल्यामुळे माझ्या पक्षातील अनेक नेते नाराज, असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं. पक्षात अनेक लोकांना संधी द्यायची आहे, पण विस्तार झालेला नाही. त्यामुळे कशी संधी देण्यात येणार?, अशी खंत दादांनी व्यक्त केली.
वर्षभराआधी महायुतीत अजित पवार सहभागी झाले. त्याआधी अजित पवारांची चर्चा अमित शाहांशीच झाली. त्यामुळं दादांना बोलायचं झालं तर भाजपच्या हायकमांडपैकी ते शाहांशीच बोलतात. आता, 45 मिनिटं मध्यरात्री काय खलबतं झाली हे अजित पवारच सांगू शकतील. पण दादांच्या या भेटीनंतर आता, मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री 27 तारखेला दिल्लीला जाणार आहेत.