अजित पवार लोकसभा निवडणूक लढणार? म्हणाले, ‘मध्यस्थी लागत नाही, मी डायरेक्ट…’
केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर होते. यावरून उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र, या चर्चांना अजित पवार यांनी पूर्णविराम दिलाय. तसेच त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत मोठं विधान केलंय.
पुणे : 25 सप्टेंबर 2023 | केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यात मी नव्हतो. याधीही मी सांगितले की माझ्या कामाचे नियोजन केले होते. काही तारखा आधीच ठरलेल्या होत्या. त्यामुळे मी तिथे नव्हतो. शरद पवार यांनी अदानी यांची भेट घेतली असेल तर त्याबाबत मला विचारू नका. मला बाकीचे काहीच माहीत नाही. राज्याचा विकासाचा प्रश्न विचारला तर त्याला उत्तर द्यायला मी बांधील आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. नागपूरमध्ये पाण्याचा निचरा कसा होतोय हे पाहिलं पाहिजे. प्रशासनाने अनेक गोष्टी बघून केल्या पाहिजे. यासाठी कुणाला दोष देऊ नये असेही अजितदादा म्हणाले.
१६ आमदार अपात्र प्रकरणाच्या बातम्या गेल्या १४ महिन्यापासून ऐकत आहे. प्रत्येक यंत्रणा त्या त्या पद्धतीने काम करते. जोपर्यंत कुठला निकाल लागत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री पदाचा विचार करता येणार नाही. आमचीही सगळी कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे पाठविली आहे. ते योग्य निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले.
मुस्लिम आरक्षणाचा निर्णय लवकरच
मी अल्पसंख्याक मंत्री आणि इतर मंडळीसोबत बैठक घेतली होती. वक्फ बोर्डाबद्दलही चर्चा झाली. महाराजांचा आदर्श समोर ठेऊन आणि शाहू, फुले यांची विचारधारा घेऊन मी पुढे जातोय. दिलेल्या आरक्षणाला धक्का न लागता सगळी कामे होतील. कायद्याच्या चौकटीत सगळं बसवले जाईल आणि निर्णय होईल असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
धनगर समाजाबद्दल खूप वेळा बैठका झाल्या. अनेक रिसर्च झाले. परंतु, धनगर समाजाला समाधान मिळेल असे आरक्षण मिळायला हवे. धनगर यांना एनटीमधून आरक्षण मिळायला हवे होते. पण, ते धनगड आणि धनगर यावरच अडकले आहे अशी माहिती त्यांनी दिली.
अंगाला भोकं पडत नाहीत
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजितदादांवर टीका केली होती. त्याला उत्तर देताना ते म्हणाले, कोणीही माझ्यावर टीका केली तर विनाश काले विपरीत बुद्धी म्हणतो आणि सोडून देतो. कोणी ही काही टीका केली तरी माझ्या अंगाला भोकं पडत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.
एक घाव २ तुकडे केले असते
पुण्याचे पालकमंत्री होण्याची माझी काही इच्छा नाही. त्याबाबत माझी कुणाशी चर्चा नाही. चर्चा झाली असती आणि मला जर पालकमंत्री व्हायचे असते तर एक घाव २ तुकडे केले असते. मी कुठेच चर्चा केली नाही. पालकमंत्री यांचा प्रतिनिधी म्हणून मी बैठकीला जातो. मात्र, कोणाला पालकमंत्री करायचं हा निर्णय मुख्यमंत्री यांचा आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणूक लढणार का?
बारामतीमधून लोकसभेची निवडणूक लढवायची की नाही या अद्याप विचार केलेला नाही. कुणाशी चर्चा करून काही नवीन प्रश्न निर्माण करणार नाही असे ते म्हणाले. तर, एकनाथ खडसे यांना मी काहीही विचारले नाही. मी असला माणूस नाही. मला विचारायचे असेल तर मी डायरेक्ट विचारेल. अजित पवारला मध्यस्थी लागत नाही असा टोलाही त्यांनी लगावला.