“तर तुमच्या दवाखान्याची राख करेन”, शिवसेनेच्या आमदाराचा संताप, ऑडिओ क्लिपमध्ये काय?
अकोल्यातील एका खासगी रुग्णालयाने डिपॉझिट नसल्याने रुग्णाला व्हेंटिलेटर देण्यास नकार दिला, या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला कठोर शब्दांत जबाबदार धरले आहे. त्यांचा रुग्णालय व्यवस्थापनाशी झालेल्या संभाषणाचा ऑडिओ क्लिप व्हायरल झाला आहे.

सध्या पुणे शहरातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे चर्चेत आहे. या रुग्णालयाचा हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचे प्रकरण सध्या तापले आहे. त्यातच आता अकोल्यातही असाच काहीचा प्रकार समोर आला आहे. अकोल्यातील एका खासगी रुग्णालयाने डिपॉझिट न भरल्याने रुग्णाला व्हेंटिलेटर नाकारल्याचा आरोप होत आहे. आता याप्रकरणी शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी खासगी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला चांगलेच झापल्याचे समोर आले आहे. त्यांची एक कथित ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील एका कार्यकर्त्यांने आमदार संतोष बांगर यांना फोन करून एका खासगी रुग्णालयाबद्दल तक्रार केली. हे रुग्णालय त्या कार्यकर्त्याच्या नातेवाईकांना दाखल करून घेण्यास नकार देत असल्याची तक्रार त्यांनी केली. यानंतर आमदार संतोष बांगर यांनी तातडीने रुग्णालयाच्या व्यवस्थापकाला फोन केला. त्यांची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली.
व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये आमदार संतोष बांगर रुग्णालयाच्या व्यवस्थापकाला खडसावत असल्याचे ऐकू येते. “तुमचं हॉस्पिटल कोणतं? तुम्ही या पद्धतीने करता का? लोकांकडे पैसे नसतील तर तुम्ही व्हेंटिलेटरवर पेशंटला घेत नाही? पैसे दिल्याशिवाय पेशंटला व्हेंटिलेटरवर घेत नाही, असं म्हणता? पेशंटला जर कमी जास्त झालं, तर तुमच्या दवाखान्याची राख करेन, लक्षात ठेवा.” अशा शब्दात संतोष बांगर यांनी रुग्णालयाला दम दिला.
संतोष बांगर आणि रुग्णालयाच्या व्यवस्थापनाचे संभाषण काय?
- संतोष बांगर – हॅलो, आमदार बांगर बोलतोय? कोण बोलतंय?
- खासगी रुग्णालय – हा सर बोला
- संतोष बांगर – तुमचं हॉस्पिटल कोणतं? तुम्ही यापद्धतीने करता का? लोकांकडे पैसे नसतील तर तुम्ही व्हेंटिलेटरवर पेशंटला घेत नाही? पैसे दिल्याशिवाय पेशंटला व्हेंटिलेटरवर घेत नाही, असं म्हणता?
- संतोष बांगर – पेशंटला जर कमी जास्त झालं, तर तुमच्या दवाखान्याची राख करेन, लक्षात ठेवा.
दरम्यान, या ऑडिओ रेकॉर्डिंगची टीव्ही 9 मराठी पुष्टी करत नाही. मात्र, संतोष बांगर यांनी रुग्णांच्या मदतीसाठी घेतलेल्या भूमिकेची चर्चा सध्या शहरात चांगलीच रंगली आहे. रुग्णालयाकडून या आरोपांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.