Corona update : राज्यातील सर्व वसतिगृह बंद राहणार, कोणती विद्यालयं सुरू, कोणती बंद? वाचा सविस्तर
राज्यात सध्या कोरोना आणि ओमिक्रॉनचा कहर सुरू आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची खबरदारी म्हणून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व वसतिगृह बंद राहणार आहेत, तर 15 फेब्रुवारीपर्यंत अकृषीय विद्यालये बंद राहणार असल्याची घोषणा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. तसेच तंत्रनिकेतन विद्यालयेही बंद राहणार आहेत.
मुंबई : राज्यात सध्या कोरोना आणि ओमिक्रॉनचा कहर सुरू आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची खबरदारी म्हणून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व वसतिगृह बंद राहणार आहेत, तर 15 फेब्रुवारीपर्यंत अकृषीय विद्यालये बंद राहणार असल्याची घोषणा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. तसेच तंत्रनिकेतन विद्यालयेही बंद राहणार आहेत.
विद्यार्थ्यांसाठी नवी नियमावली काय?
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कोविड व ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ/महाविद्यालयीन परीक्षा, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे लसीकरणाबाबत ऑनलाईन राज्यातील विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, अकृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांच्यासमवेत कोविड परिस्थितीचा काल आढावा बैठक घेतली. त्यानंतर विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्या. यामध्ये विजेची अनुपलब्धता किंवा नेटवर्क कनेक्टिविटी नसल्यामुळे अथवा स्वत: विद्यार्थी किंवा कुटुंबीय कोविडबाधित असल्यास संबंधित विद्यार्थी परीक्षा देऊ शकला नाही तर अशा विद्यार्थ्यांची ऑनलाइन पद्धतीने पुनर्परीक्षा देण्याची संधी देण्यात यावी. तसेच गोंडवाना विद्यापीठ, जळगाव विद्यापीठ व नांदेड विद्यापीठाशी संलग्नित काही भागात नेटवर्किंग सेवा विस्कळीत असल्यास किंवा उपलब्ध नसल्यास संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन ऑफलाईन स्वरुपात या भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे नियोजन करावे. अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
शंका दूर करण्यासाठी हेल्पलाईन
परिक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना येणाऱ्या संभाव्य अडचणी व शंकाचे निरसन करण्यासाठी विद्यापीठ /महाविद्यालयाने हेल्पलाईन व्यवस्था सुरु करावी. परीक्षेची कार्यपद्धती, परीक्षांचा अभ्यासक्रम, नमुना प्रश्नसंच इ. विद्यापीठानी त्यांच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून द्यावी. सर्व विद्यापीठे तसेच महाविद्यालयाशी संबंधित वसतिगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांना पूर्वसूचना व कालावधी देऊन ही वसतिगृह बंद करण्यात यावेत. यामध्ये परदेशी विद्यार्थी आणि संशोधन करीत असलेली पीएचडीचे विद्यार्थी यांना वसतीगृहात राहण्याची परवानगी देण्यात यावी. या विद्यार्थ्यांना संसर्ग होणार नाही याबाबत विद्यापीठ व महाविद्यालय प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी. स्थानिक प्राधिकरण कोविड केअर सेंटर म्हणून वसतिगृह आवश्यकता असल्यास ती उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचनाही सामंत यांनी यावेळी केल्या.
विद्यार्थ्यांच्या लसीकरणावर भर
विद्यापीठे तसेच महाविद्यालयानी अद्याप लसीकरण न झालेल्या विद्यार्थी यादी स्थानिक प्राधिकरणना देऊन लसीकरण साठी विशेष मोहीम राबवून तसेच विद्यार्थीया मध्ये जनजागृती करून तातडीने लसीकरण पूर्ण करून घ्यावे. तंत्रनिकेतन मधील विद्यार्थी 15 ते 18 या वयोगटातील असल्याने व या वयोगटातील व्यक्तीचे लसीकरण सुरू झाले असल्याने संचालक तंत्रशिक्षण यांनी लसीकरण करावयाच्या विद्यार्थ्यांची यादी स्थानिक प्राधिकरणाला उपलब्ध करून द्यावी आणि विशेष मोहिमेद्वारे लसीकरण पूर्ण करून घावेत. तसेच संचालक कला यांनी ऑनलाईन चित्रकला परीक्षेसंदर्भात नियोजन करुन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेण्यात याव्यात. तसेच विद्यापीठ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची चक्राकार पद्धतीने 50 टक्के उपस्थितीचे नियोजन करण्यात यावे. विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या या संकटावर मात करण्यासाठी मास्क वापरणे, हात वारंवार धुणे, सामाजिक अंतर राखणे या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही सामंत यांनी यावेळी केले.