बीडचे बिहार झाले की काय? संतोष देशमुख हत्या प्रकरणाची A टू Z माहिती
आरोपांनुसार संतोष देशमुखांच्या छातीवर कुस्ती स्टाईलने उड्या मारल्या गेल्या आहे. ज्यामुळे त्यांच्या काही बरगड्या हृद्यात शिरल्या. त्यांचा डोळा लायटरनं जाळण्यात आला. पाणी मागत असताना घशात कोणतातरी पदार्थ टाकण्याचा प्रयत्न झाला.
बीड जिल्ह्यातल्या कायदा-सुव्यवस्थेवर फक्त विरोधकच नाहीत, तर बीड जिल्ह्यातील आमदारही चिंता व्यक्त करत आहेत. त्यामुळे खरोखर बीडचा बिहार होत आहे की काय? हा प्रश्न आहे. मग बीडमध्ये गँग्स ऑफ वासेपूरसारख्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत.
बीड जिल्ह्यात गँग्स ऑफ वासेपूर रंगलंय का? बिहारहूनही भयावह परिस्थिती बीडची झाली आहे. सरपंच संतोष देशमुखांची क्रृर हत्येमुळे या प्रतिक्रिया समोर येत आहे. संतोष देशमुख हत्येमध्ये प्रामुख्याने वाल्मिक कराडचे नाव समोर आले आहे. वाल्मिक कराड हा व्यक्ती मंत्री धनंजय मुंडे यांचा राईट हँड आहे. लोक वाल्मिक कराड याला प्रति धनंजय मुंडे तर काही जण धनंजय मुंडेंहूनही मोठा मानतात. समारंभ असो की सेलीब्रेशन, मेळावा असो किंवा राडा, मंत्री धनंजय मुंडेंसोबत तो सावली प्रमाणे असतो.
वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. एक-दोन अपवाद सोडून अनेक नेते वाल्मिक कराडचे नाव घ्यायला का कचरले? हा देखील मुद्दा सभागृहात उपस्थित झाला आहे. मंत्री धनंजय मुंडेंच्या मते विरोधक बीड जिल्ह्याला बिहार म्हणून बदनामी करता आहेत. पण वास्तवात बीड जिल्ह्यातल्या 6 आमदारांपैकी विरोधक म्हणून एकच आमदार जिंकला आहे. त्या एका विरोधी आमदारासह धनंजय मुंडेंच्याच सत्तेतील सत्ताधारी पाचही आमदार बीडच्या गुन्हेगारीबद्दल चिंता व्यक्त करत आहे.
सरपंच संतोष देशमुखांचा खून हा गेल्या काही दशकातील महाराष्ट्रातला सर्वाधिक निर्घृण खून आहे. जल्लादांनाही पाझर फुटावा, राक्षसाचाही आत्मा थरथर कापावा, इतक्या पाशवीपणे सरपंचाला मारले गेले आहे. तक्रारीनुसार आरोपींनी सरपंचाच्या गावच्या एका वॉचमनला मारहाण केली. त्याचा जाब विचारायला गेलेले सरपंच संतोष देशमुखांसोबत आरोपींची मारहाण झाली. त्या एका घटनेवरुन असे काय झाले की इतक्या क्रृरपणे खून करण्यात आला, हे अद्याप डॉक्टर आणि पोलिसांनाही उमगलेले नाही.
आरोपांनुसार संतोष देशमुखांच्या छातीवर कुस्ती स्टाईलने उड्या मारल्या गेल्या आहे. ज्यामुळे त्यांच्या काही बरगड्या हृद्यात शिरल्या. त्यांचा डोळा लायटरनं जाळण्यात आला. पाणी मागत असताना घशात कोणतातरी पदार्थ टाकण्याचा प्रयत्न झाला. आरोपींनी स्वतःच्या पायावर पाणी टाकून संतोष देशमुखांना पाय चाटायला लावले. गुप्तांगावर मारहाण करण्यात आली आणि मारहाण कशी होतेय हे आरोपी व्हिडीओ कॉलद्वारे एका व्यक्तीला ते लाईव्ह दाखवत होते. काल सभागृहात बीडच्या चर्चेवेळी सुरेश धस आणि आव्हाडांच्या भाषणाने सभागृह स्तब्ध झाले. अनेकांना या हत्येचं गांभीर्य प्रकर्शाने जाणवले. मात्र जे सुरेश धस एकीकडे बीड पोलिसांवर दबाव असल्याचे म्हणत होते, त्यांनी स्थानिक पोलिसांकडेच तपास देण्याचे म्हटल्याने आश्चर्यही व्यक्त करण्यात आले.
तपास कुठवर आला याबद्दल 4 दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंनी सभागृहात मुख्यमंत्री उत्तर देणार असल्याचे म्हटले होते. मात्र कालपासून बीडची चर्चा सुरु होत असताना मंत्री धनंजय मुंडे सभागृहात गैरहजर आहेत. अपहरण आणि हत्येवेळी आरोपींसह पोलिसांचे कॉल डिटेल्स, लोकेशन तपासण्यावर बहुतांश नेते जोर देत आहेत.
सरपंचांच्या हत्येचा ‘आका’, फडणवीसांचा कोणाकडे इशारा ?
बीडच्या संरपच हत्या प्रकरणावरुन वाल्मिक कराडच्या अटकेसाठी विरोधक आक्रमक आहेत. हत्येचा आका, मंत्रिमंडळात असून त्याची हकालपट्टी करा, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक इशारा दिला. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या निघृण हत्येवरुन सलग चौथ्या दिवशी विरोधक आक्रमक झाल. या हत्येमागे मंत्रिमंडळातील एक आका असून मास्टरमाईंड वाल्मिक कराडला अटक करा, नाही तर जनताच रस्त्यावर उतरेल असा इशारा आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिला.
संदीप क्षीरसागर म्हणाले, पवनचक्कीत 2 कोटींच्या खंडणीच्या प्रकरणात सरपंच संतोष देशमुखांनी हस्तक्षेप केला. यामुळे राक्षसी कृत्याप्रमाणे संतोष देशमुखांचा जीव घेतला गेला. पोस्टमार्टेम रिपोर्टमध्येही मारहाण आणि अतिरक्तस्रावाचा उल्लेख आहे.छाती, डोके, हात-पाय, चेहऱ्यावर जबर मारहाण झाली आहे. चेहरा, डोळ्याचा भाग मारहाणीमुळे काळा-निळा पडला होता. संतोष देशमुखांचा मृत्यू ‘हॅमरेज अॅण्ड शॉक ड्यू टू मल्टिपल इन्जुरिज’मुळे झाला आहे. जबर मारहाण केल्यामुळे संतोष देशमुख यांच्या शरिरातून अतिरक्तस्त्राव झाला आहे.