आदल्या दिवशी सामनातून नियुक्त्या अन् दुसऱ्या दिवशी ठाकरे गटाला खिंडार; अनेकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
Shivsena Uddhav Thackeray Group Leader inter in CM Eknath Shinde Group : मंगळवारी सामनातून नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या अन् बुधवारी शिवसेना उद्धव ठाकरे गटालाला खिंडार!; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याच्या उपस्थितीत केला प्रवेश. वाचा सविस्तर बातमी.
अंबरनाथ : 30 नोव्हेंबर 2023 : एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केलं. त्यांच्या या बंडानंतर एक-एक करत अनेक नेते, पदाधिकारी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. यातील बरेचसे लोक हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आणि एकनाथ शिंदे यांची ताकद वाढली. आता एकनाथ शिंदे भाजपसोबत जाऊन जवळपास दीडवर्ष झालं आहे. पण तरीही ठाकरे यांची साथ सोडत शिंदेंसोबत जाण्याऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. नुकतंच अंबरनाथमधील काही पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
ठाकरे गटाच्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
अंबरनाथमध्ये ठाकरे गटाच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे मंगळवारीच ठाकरे गटाने अंबरनाथ शहरातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची सामनातून घोषणा केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बुधवारी ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
आदल्या दिवशी नियुक्ती अन् दुसऱ्या दिवशी खिंडार!
अंबरनाथ शहरातील उबाठा गटाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची मंगळवारी ठाकरे गटाचे मुखपत्र सामनातून घोषणा करण्यात आली होती. मात्र याला 24 तासही उलटत नाहीत. तोच ठाकरे गटाचे अंबरनाथचे उपशहरप्रमुख अनिल भोईर, युवासेना सरचिटणीस योगेश हातेकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. या दोघांसह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यापूर्वीही उबाठा गटाच्या शहरप्रमुखांसह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली होती. आता आणखी एकदा ठाकरे गटाच्या नेत्यांनी शिंदेगटाची वाट धरली आहे.
अंबरनाथच्या विकासासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात आहोत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात जो विकास सुरु आहे. त्यामुळे लोकांची कामं होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी लोकांचा जनाधार आहे. त्यामुळे लोकहितासाठी आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात आहोत, असं या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं. तसंच आपण एकनाथ शिंदेंसोबत गेल्यानंतर आपल्या अंबरनाथचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं या नेत्यांनी म्हटलं.