अमित शाह आणि अजित पवार यांच्या भेटीबाबतची मोठी अपडेट, ‘या’ ठिकाणी भेट झाल्याची चर्चा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर अमित शाह यांची मुंबई विमानतळावर जावून भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. अमित शाह मुंबई दौऱ्यावर आल्यानंतर अजित पवारांनी त्यांची भेट न घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. अखेर या चर्चांनंतर अजित पवारांनी अमित शाह यांची भेट घेतली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. शाह यांच्या या दौऱ्यादरम्यान महायुतीच्या नेत्यांमध्ये रात्री उशिरा महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. पण या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार नव्हते. विशेष म्हणजे अजित पवार हे मुंबईत असून अमित शाह यांच्या भेटीला गेले नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होतं. अखेर अजित पवार यांनी अमित शाह यांची मुंबई विमानतळावर जावून भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, अमित शाह यांनी आज मुंबईत लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. अमित शाह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले तेव्हा त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. पण अजित पवार त्यांच्यासोबत नव्हते. त्यामुळे याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. पण आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार अमित शाह यांना मुंबई विमानतळावर भेटल्याची माहिती मिळत आहे.
अमित शाह रविवारी रात्री मुंबईत दाखल झाले. अमित शाह यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर बैठकांचं सत्र पार पडलं. यामध्ये अमित शाह यांची महायुतीच्या नेत्यांसोबतची बैठक, तसेच अमित शाह यांची राज्यातील भाजपच्या कोअर कमिटीसोबतची बैठक या बैठकांचा समावेश होता. या बैठकांचं सत्र आटोपल्यानंतर अमित शाह यांचा काल रात्री सह्याद्री अतिथीगृह येथेच मुक्काम होता. यानंतर अमित शाह यांनी आज सकाळपासून विविध ठिकाणच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.
अमित शाह यांनी आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचं देखील दर्शन घेतलं. तसेच भाजप नेते आशिष शेलार यांच्या वांद्रे येथील मंडळाच्या बाप्पाचंदेखील दर्शन घेतलं. या दरम्यान, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त चर्चा झाल्याची देखील चर्चा आहे. अमित शाह यांच्या या दोन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस कालपासून त्यांच्यासोबत बघायला मिळाले. पण अजित पवार हे अलिप्त राहिले.
विशेष म्हणजे अजित पवार काल बारामती दौरा संपवून मुंबईत आले होते. पण तरीही त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली नाही. अखेर सर्वत्र चर्चा झाल्यानंतर अमित शाह मुंबई दौरा संपवून दिल्लीला रवाना होत असताना अजित पवार यांनी मुंबई विमानतळावर जावून शाह यांची धावती भेट घेतली. त्यामुळे याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.