अमित शाह यांचा महाराष्ट्रातील मंत्र्यांना सज्जड दम, ‘प्रतिमा खराब होईल, अशी कामे…’
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महायुतीच्या मंत्र्यांना सज्जड दम दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. "काम करताना प्रतिमा चांगली ठेवा. सरकार प्रतिमेला धक्का लागेल असं कृत्य करू नका", असा दम अमित शाह यांनी मंत्र्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज शिर्डी दौऱ्यावर आहेत. भाजपकडून विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर शिर्डीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं शिबीर आयोजित करण्यात आलं. या कार्यक्रमाला राज्यातील भाजपचे सर्व मंत्री, नेते उपस्थित होते. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील या कार्यक्रमासाठी शिर्डीत आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात भाषण करताना महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील आपल्या भाषणातून महाविकास आघाडीवर चौफेर टीका केली. अमित शाह यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. यावेळी अमित शाह यांनी आपले कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मंत्र्यांना महापालिका निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना केल्या. या सर्व घडामोडींदरम्यान, शिर्डीत पडद्यामागे काही महत्त्वाच्या घडामोडी देखील घडल्या. सूत्रांकडून या घडामोडींची माहिती समोर आली आहे. बंद दरवाज्याआड अमित शाह यांची भाजपच्या मंत्र्यांसोबत पार पडलेल्या बैठकीत त्यांनी राज्य सरकारमधील सर्व मंत्र्यांना सज्जड दम दिल्याची माहिती आहे.
शिर्डीतील भाजपच्या शिबीरनंतर अमित शाह यांच्या नेतृत्वात दोन प्रमुख बैठका झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिर्डीतील हॉटेल सन अन्ड सँड येथे या दोन प्रमुख बैठका पार पडल्याची माहिती आहे. यातील अमित शाह यांची पहिली बैठक ही नवनिर्वाचित मंत्र्यांसोबत पार पडली. तर दुसरी बैठक भाजपा कोअर कमिटीसोबत पार पडली. या दोन्ही बैठकीत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या बैठकांमध्ये अमित शाह यांनी आपल्या मंत्र्यांना सज्जड दम दिल्याची सूत्रांची माहिती आहे.
अमित शाह नेमकं काय म्हणाले?
“प्रतिमा खराब होईल, अशी कामे करु नका”, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील सर्वच मंत्र्यांना सज्जड दम दिला आहे. “मंत्र्यांनी जनतेशी जास्तीत जास्त संपर्क ठेवा”, अशी सूचना देखील अमित शाह यांनी केली. “इतकंच नाही तर राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांची जास्तीत जास्त अंमलबाजवणी करा”, असं देखील अमित शाह यांनी सर्वच मंत्र्यांना सांगितलं आहे.
अमित शाह यांचा मंत्र्यांना सजड दम काय?
- ‘काम करताना प्रतिमा चांगली ठेवा.’
- ‘सरकार प्रतिमेला धक्का लागेल असं कृत्य करू नका.’
- ‘मंत्र्यांनी जनतेशी जास्तीत जास्त संपर्क ठेवा.’
- ‘राज्य आणि केंद्र शासनाच्या योजनांची जास्तीत जास्त अमंलबजावणी करा.’