अमित ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याचा दुसरा दिवस; पालिका आयुक्तांना भेटणार
Amit Thackeray | अमित ठाकरे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांचीही भेट घेणार आहेत. शहरातल्या काही महत्त्वांच्या विषयांवर ही भेट होणार असल्याची माहिती कळते आहे. अमित ठाकरे काही महत्त्वाचे विषय आयुक्त कैलास जाधव यांच्या कानावर घालू शकतात.
नाशिक: आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक दौऱ्यावर आलेले राज ठाकरे यांचे पूत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. आज दिवसभरात अमित ठाकरे नाशिकमध्ये मनसेची सत्ता असताना उभारलेल्या प्रकल्पांची पाहणी करणार आहेत. यामध्ये बोटॅनिकल गार्डनचा समावेश आहे. याशिवाय, अमित ठाकरे बाळासाहेब ठाकरे स्मारकालाही भेट देतील.
दरम्यान, अमित ठाकरे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांचीही भेट घेणार आहेत. शहरातल्या काही महत्त्वांच्या विषयांवर ही भेट होणार असल्याची माहिती कळते आहे. अमित ठाकरे काही महत्त्वाचे विषय आयुक्त कैलास जाधव यांच्या कानावर घालू शकतात. गेल्या काही दिवसांपासून अमित ठाकरे पक्षात चांगलेच सक्रिय झाले आहेत. पक्षांतील नेते-कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन ते विविध विषय समजून घेत आहेत. त्यातच आता महापालिका निवडणुका असल्याने अमित यांचा अॅक्टिव्हनेस वाढलाय. त्यांनी काही दिवसांपूर्वीच नाशिक दौरा केला होता. त्यानंतर कालपासून पुन्हा त्यांनी नाशिकचा दौरा सुरु केलाय.
अमित ठाकरेंवर नाशिक महापालिका जबाबदारी
अमित ठाकरे यांच्या नाशकामधल्या फेऱ्या वाढल्या आहेत. त्यांनी नाशिक शहरात जातीने लक्ष घालायला सुरुवात केली आहे. नाशिक महापालिकेची निवडणूक तोंडावर असल्याने ते कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्या दृष्टीने तयारी करत आहेत. म्हणजेच अमित ठाकरेंवर नाशिक महापालिकेची जबाबदारी सोपविण्यात आली, अशी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
राज ठाकरेंचा पुण्यात तळ
एकीकडे अमित ठाकरे नाशिकमध्ये तयारी करत असताना राज ठाकरे सध्या पुण्यात तळ ठोकून आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीची रणनीती कशी असेल, यावर ते स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळाचे पुणे आणि नाशिकमधील घडामोडींकडे लक्ष लागून राहिले आहे.
संबंधित बातम्या:
नाशिक महापालिकेसाठी मनसेची जोरदार तयारी, अमित ठाकरेंचा वन-टू-वन संवाद, मनसैनिकांमध्ये उत्साह
भाजपसोबत युती नाहीच, नाशिकमध्ये मनसे स्वबळावर लढणार, संदीप देशपांडेची घोषणा
राज ठाकरे पुण्यात, अमित ठाकरे नाशिकमध्ये, महापालिका निवडणुकीसाठी बापलेकाने दंड थोपटले!