‘आव्हाड तुतारी वाजवून दाखवा, पण आवाज तुतारीतून आला पाहिजे’, अमोल मिटकरींनी खिजवलं
शिवरायांना नमन करुन तुतारी वाजवत, रायगडावरुन सुरुवात करणार, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. दिल्लीच्या तख्ताला भीती वाटणारा तुतारीचा आवाज असेल, असं आव्हाडांनी म्हटलं आहे. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय.
मुंबई | 23 फेब्रुवारी 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळालं आहे. शरद पवार गटाचं तुतारी चिन्हाचं उद्या किल्ले रायगडावर अनावरण होणार आहे. यावेळी शरद पवार स्वत: उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे शरद पवार गटाने आता आगामी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाला निवडणूक आयोगाकडून तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर प्रतिक्रिया दिलीय. शिवरायांना नमन करुन तुतारी वाजवत, रायगडावरुन सुरुवात करणार, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. दिल्लीच्या तख्ताला भीती वाटणारा तुतारीचा आवाज असेल, असं आव्हाडांनी म्हटलं आहे. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय. जितेंद्र आव्हाड यांनी तुतारी फुंकून दाखवावी. 1 लाख बक्षीस देतो, अशी मिश्किल टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.
“एक तुतारी द्या मज आणुनी फुंकीन जी मी स्वप्राणाने… आमचं जितेंद्र आव्हाड यांना चॅलेंज आहे, त्यांनी तुतारी उचलून फुंकून दाखवावी, आपल्याकडून 1 लाखाचं बक्षीस घेऊन जावं. फक्त अट अशी आहे, आवाज तुतारीतून आला पाहिजे. तुतारीला कालपासून मार्केट आहे. पण हरकत नाही. विषारी तुतारी वाजवायला माणूस आहे”, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली.
‘अशी घटना भारताच्या इतिहासात कधी झालेली नाही’
दरम्यान, निवडणूक आयोगाकडून तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अशी घटना भारताच्या इतिहासात कधी झालेली नाही की, पक्षाचा संस्थापक सदस्य आणि अध्यक्षाकडून त्याचा पक्ष काढून घेतला. हे दुर्देवी आहे. ही नवीन काहीतरी खेळी आहे. पण ठीक आहे अदृश्य शक्तीच आता देश चालवते. अदृश्य शक्तीने कितीही आमच्यावर अन्याय केला, घात केला, धमक्या दिल्या तरी आम्ही घाबरणार नाही. आम्ही शुन्यातून पुन्हा एकदा काम सुरु करु. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि तुतारी हे आमचं चिन्ह आहे. नवीन उमेदीने ही तुतारी काय संकेत देते हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.
‘शरद पवार म्हणजे घड्याळ’, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
विशेष म्हणजे यावर सत्ताधारी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील प्रतिक्रिया दिलीय. “आता प्रत्येकाकडे असलेले मोबाईल आणि मीडिया या माध्यमातून ही गोष्ट फार दूपर्यंत पोहोचू शकते. पूर्वी फार अडचणी यायच्या. पण आज तशा अडचणी नाहीत. तरीही थोडीफार अडचण येतेच. खेड्यामध्ये राहणारी मंडळी असते, त्यांच्या मनावर बिंबलेलं असतं की, शरद पवार म्हणजे घड्याळ”, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.