अमरावतीचं माझ्यावर कर्ज, जगाच्या नकाशावर शहराला मिळेल ओळख, विमानतळाच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही
डबल इंजिनचं सरकार असलं म्हणजे काय होतं,हे मंत्री महोदयांनी आत्ता सांगितलं. पण आमचं केवळ डबल इंजिनचं सरकार नाही तर डबल बुस्टर सरकार आहे. म्हणून आमचं सरकार वेगाने चालतंय. आम्ही तिघेही महाराष्ट्राचा विकास करत आहोत

असं म्हणतात की श्रीकृष्णाने रुक्मिणीचं हरण वायूवेगाने केलं होतं, तो वायुवेग तर आपल्याला पाहता आला नाही. पण अमरावतीत वायू वेगाने येता येईल आणि वायू वेगाने जाता येईल. ही व्यवस्था मोदींच्या सरकारने केली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलं. डबल इंजिनचं सरकार असलं म्हणजे काय होतं, हे मंत्री महोदयांनी आत्ता सांगितलं. पण आमचं केवळ डबल इंजिनचं सरकार नाही तर डबल बुस्टर सरकार आहे. म्हणून आमचं सरकार वेगाने चालतंय. आम्ही तिघेही महाराष्ट्राचा विकास करत आहोत. महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करायचं आहे,असे मुख्यमंत्री म्हणाले.
अमरावती विमानतळ आता सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं झालं असून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज या विमानतळाचं उद्घाटन झालं. यावेळी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसंच अख्खं मंत्रीमंडळच उपस्थित होतं. आधी या विमानाची सेवा फक्त व्हीआयपींसाठी होती, पण आजपासून सामान्य नागरिकांनाही या सेवेचा लाभ घेता आहे. रेल्वेने अमरावतीवरून मुंबईला यायला 12 तास लागतात. विमान सेवेमुळे हा अंतर अवघ्या पावणे दोन तासाचे होणार आहे. त्यामुळे आता अमरावतीकरांचे 10 तास वाचणार आहेत.
अमरावतीचं माझ्यावर कर्ज
या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी केलेल्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपलं अमरावतीशी अनोखं नातं असल्याचं सांगितलं. अमरावतीचं माझ्यावर कर्ज आहे. माझी आई अमरावतीची आहे, त्यामुळे अमरावतीशी माझं वेगळं नातं आहे. अमरावतीत काही चांगलं झालं तर सर्वाधिक आनंद माझ्या आईला होतो. त्यामुळे आईला आनंद देणं माझ्या आनंदाचं एक कारण असतं,असं मुख्यमंत्री म्हणाले.
आज या एअरपोर्टचं काम आपण पूर्ण केलं. 2019 साली काम सुरू केलं होतं. मोदींच्या सरकारमध्ये प्रयत्न करून महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने काम हाती घेतलं. धावपट्टीचं विस्तारीकरण केलं, नवनीत राणा सोबत होत्या. त्यानंतर काही कारणाने बंद पडलं होतं. केंद्र सरकारशी संबंधित काम सुरू होतं. राज्य सरकारशी संबंधित काम संथगतीने होतं. पण शिंदे सरकार आल्यानंतर वेगाने काम सुरू केल्याचं फडणवीस म्हणाले.
अमरावती जगाच्या नकाशावर येणार
केंद्र सरकारने एअरपोर्टला पहिलं विमान दिलं. या विमानात बसून आम्ही आलो. या ठिकाणी पायलट ट्रेनिंग स्कूल सुरू होणार आहे. एका पायलट ट्रेनिंग स्कूलमुळे अमरावती जगाच्या नकाशावर येणार आहे, असं मुख्यंमत्र्यांनी सांगितलं. साऊथ ईस्ट एशियामधील सर्वात मोठं स्कूल असणार आहे. दरवर्षी 180 पायलट अमरावतीतून तयार होतील, जवळपास 34 विमाने पार्क असतील. ही विमाने ट्रेनिंग देतील. पायलट ट्रेनिंग स्कूल आल्याने अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. जॉब वाढेल. मोदी सरकारच्या कार्यकाळात मिळालेली मोठी भेट आहे. अमरावती एक शहर म्हणून ओळखलं जाणार नाही. तर जगाच्या पाठीवर साऊथ इस्ट एशियातील सर्वात मोठी पायलट ट्रेनिंग स्कूल कुठे आहे, तर आपल्या अमरावतीत आहे, अशा प्रकारची अमरावतीला ओळख मिळणार आहे,असंही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.
दोन लाख लोकांना मिळणार रोजगार
मोदींना सात टेक्स्टाईल पार्क तयार करायचा ठरवलं होतं. त्यातील एक पार्क अमरावतीला देण्याचं मोदींनी मान्य केलं. आता तो सुरू होतोय, 2 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. आपला कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे, असं फडणवीसांनी सांगितलं.
समृद्धी महामार्गामुळे मुंबईशी जोडलो गेलो आहोत. राज्यात नवीन पोर्ट झाला. वाढवण बंदरलाही आपण जोड देत आहोत. त्यामुळे विदर्भ जेएनपीटीशी आणि वाढवण बंदरशीही जोडला जाणार आहे. त्यामुळे पोर्ट लेअर इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. सात लाख कोटीचे करार विदर्भातील आहे. दावोसमधील हे करार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
उद्योग हवे असतील तर…
नदी जोड प्रकल्पाने सात जिल्ह्यांचा चेहरामोहरा बदलेल. विदर्भात दुष्काळच राहणार नाही. दुष्काळमुक्त होईल. कोरडवाहू शेतीही राहणार नाही. अमरावती विभाग हा महाराष्ट्र सरकारच्या अजेंड्यावर असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणालेय. अकोल्याच्या विमानतळाचं विस्तारीकरण होणार आहे. यवतमाळच्या विमानतळाचं विस्तारीकरण करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी विमानतळ असेल तिथे उद्योग जातो, उद्योग हवे असतील तर विमानतळाची कनेक्टिव्हिटी पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा फडणवीसांनी नमूदल केला.
अमरावतीत मेडिकल कॉलेज सुरू केलं. येत्या काळात अमरावतीत आयटी पार्क सुरू करण्याचा आपला प्रयत्न असेल. आज सुरुवात झाली आहे. आज एक फ्लाईट सुरू झाली आहे. या विमानतळाला विस्तारीत करायचं आहे. आपल्याला 3 हजार मीटरची धावपट्टी करायची आहे. पुढे काही अॅक्विझेशन तयार करायचं आहे. ते झालं तर आपली धावपट्टी वाढू शकते. अमरावतीत कोणतंही विमान उतरू शकेल अशी धावपट्टी करायची आहे,असं फडणवीस म्हणाले.