अमरावतीत पुतळा उभारणाऱ्यांनी नियम तोडले? पुतळा उभारायचा तर काय आहेत नेमके नियम?
थोर व्यक्ती किंवा राष्ट्रपुरुषांच्या पुतळा उभारणीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्य सरकारांनी पुतळ्या उभारणीसाठी विशिष्ट प्रक्रिया निश्चित केली आहे.
मुंबई– महाराष्ट्रात सध्या राष्ट्रपुरुषांच्या पुतळा उभारणीवरुन नवा वादंग निर्माण झाला आहे. अमरावतीमध्ये विना-परवानगी बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji mahraj) यांचा पुतळा प्रशासनाने हटविला आहे. ऐन कडाक्याच्या थंडीत राजकीय घमासानाने वातावरण तापले आहे. खासदार नवनीत राणा (Navneet rana) आणि रवी राणा (Ravi rana) यांच्याकडून वाद-प्रतिवादाच्या फैरी झडत आहेत. थोर व्यक्ती किंवा राष्ट्रपुरुषांच्या पुतळा उभारणीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्य सरकारांनी पुतळ्या उभारणीसाठी विशिष्ट प्रक्रिया निश्चित केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गठित समिती पुतळा उभारणीस मान्यता देते. पुतळ्याचे कागदी रेखाटन ते प्रत्यक्ष पुतळा स्थापना इथपर्यंत प्रत्येक टप्य्यावर बारकाईने पाहणी केली जाते.
राष्ट्रपुरुषांच्या पुतळा उभारणीसाठी आवश्यक कागदपत्रे, जागेची स्वरुप, पुतळ्याची रचना या सर्व बाबींविषयी एका क्लिकवर सर्व माहिती जाणून घेऊया ‘टॉप-10’ पॉईंट्समधून-
1. कोणतीही व्यक्ती/संस्था/संघटना/खासगी संस्था तसेच निम-शासकीय संस्थांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेशिवाय कोणत्याही राष्ट्रपुरुषाच्या पुतळ्याची उभारणी करता येत नाही.
2. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार, पुतळ्यांच्या उभारणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल. समितीत प्रशासनातील आयुक्त/मुख्य कार्यकारी अधिकारी/पोलीस आयुक्त/अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सदस्य असतील.
3. पुतळा उभारण्यात येणाऱ्या जागेचे मालकी पत्र किंवा 7/12 उतारा, फेरफार पत्र सादर करणे अनिवार्य ठरते. सध्या जागेबाबत कोणताही बाब न्यायप्रविष्ट नसणे बंधनकारक असते. पुतळा उभारणीच्या जागेच्या अन्य कारणासाठी वापर करता येत नाही.
4. राष्ट्रपुरुषाचा प्रस्तावित पुतळा उभारण्यात येणाऱ्या जागेत यापूर्वीच किमान 2 किलोमीटर त्रिज्येच्या कक्षेत नसावा.
5. पुतळ्याच्या क्ले-मॉडेलला कलासंचलनालयाचे मान्यता पत्र असणे आवश्यक आहे. ब्राँझ, पंचधातू किंवा कलासंचलनालयाने मान्यता दिलेल्या साहित्यांचा समावेश पुतळा निर्मितीत असावा.
6. संचालनालयाने मान्यता आणि मुख्य वास्तुविशारद तज्ज्ञांच्या निकषाप्रमाणेच पुतळ्याची उभारणी करावी.
7. पुतळा उभारणी करु इच्छिणाऱ्या संस्थेचा मागील तीन वर्षांचा आर्थिक ताळेबंद सादर करावा लागेल.
8. पुतळा उभारणाऱ्या संस्थेला पुतळ्याचे मांगल्य तसेच पावित्र्य राखण्याबाबत शपथपत्र किंवा वचनपत्र सादर करावे लागेल. भविष्यात पुतळ्याची सर्व जबाबदारी घेण्याचे शपथपत्रात नमूद करावे लागेल.
9. पुतळा उभारणी क्षेत्रात कायदा-सुव्यवस्था राखण्याबाबत पोलीस कार्यालय प्रमुखांचे ना-हरकत प्रमाणपत्र सादर करावे लागेल. 10. जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व-परवानगी शिवाय पुतळ्याची उभारणी केल्यास दंडात्मक कारवाईसोबत कायदेशीर प्रक्रियेची तरतूद आहे. तसेच पुतळा हटविण्याची कारवाईही करण्यात यावी असे शासन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
इतर बातम्या-
PHOTO: वाघिणीचा जेव्हा अंत होतो.. पेंच अभयारण्यातली 29 बछड्यांची आई दगावली, वन्यप्रेमी हळहळले!