Breaking | नागपूरला फडणवीसांकडे ताफा घेऊन निघाले होते, आमदार नितीन देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल, काय घडलं नेमकं?
अकोला, अमरावतीच्या खारपट्ट्यातील 3 महिन्यांचं बाळ जे पाणी पितं, तेच पाणी देवेंद्र फडणवीस यांना आम्ही प्यायला देणार आहोत. तेच पाणी अंघोळीसाठी देणार आहोत, तेव्हा त्यांना आमची समस्या लक्षात येईल, अशी भूमिका नितीन देशमुख यांनी मांडली आहे.
गणेश सोनोने, अकोला: अमरावती आणि अकोला (Akola) जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचा प्रश्न घेऊन नागपूरला देवेंद्र फडणवीसांकडे (Devendra Fadanvis) निघालेले आमदार नितीन देशमुख आता अडचणीत सापडले आहेत. अकोला ते नागपूर अशी पदयात्रा घेऊन निघालेल्या आमदार देशमुख आणि या पदयात्रेतील अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या पदयात्रेसाठी परवानगी मागण्यात आली नव्हती तसेच जिल्ह्यातील जमावबंदीचे आदेश धुडकावून लावल्या प्रकरणी नितीन देशमुख आणि त्यांच्या १०० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 10 एप्रिलपासून मतदार संघातील पाणी प्रश्नावर आमदार नितीन देशमुखांची अकोला ते नागपूर पदयात्रा सुरु झाली आहे. अकोल्यातील राजराजेश्वर मंदिरापासून ही यात्रा सुरु झाली असून आज ती अमरावती जिल्ह्यात दाखल झाली आहे.
अकोल्यात गुन्हा दाखल
जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन संघर्ष यात्रेसाठी गर्दी जमवल्या प्रकरणी आमदार नितीन देशमुख, ठाकरे-शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, शहर प्रमुख राजेश मिश्रा आदींसह जवळपास १०० ते १२५ जणांवर अकोल्यातील जुने शहर पोलीस स्टेशन येथे मंगळवारी रात्री गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र पदयात्रेची आगेकुच सुरूच आहे. आज ही पदयात्रा अमरावतीत पोहोचली आहे.
फडणवीसांकडे निघाले पाणी घेऊन…
आमदार नितीन देशमुख यांनी ६९ खेड्यांचा पाणीप्रश्न घेऊन ही पदयात्रा सुरु केली आहे. अकोला, अमरावती आणि त्यानंतर नागपुरात ही पदयात्रा जात आहे. १० एप्रिलपासून यात्रेला सुरुवात झाली. आज ही अमरावती जिल्ह्यात पोहोचली आहे. २१ एप्रिल रोजी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहोचणार आहे. ६९ गावांतील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून खारं पाणी प्यावं लागतंय. या पाण्यात क्षाराचं प्रमाण अति असल्याने अनेक आजारांना तोंड द्यावं लागतंय.
अगदी लहान बाळालाही हेच पाणी पाजावं लागतंय. ३ महिन्याच्या बाळाला हे पाणी इथल्या महिला पाजतात, तेव्हा त्यांना काय वेदना होत असतील, असा भावनिक प्रश्न आमदार देशमुख यांनी विचारलाय. महिला आणि येथील नागरिकांचा हाच प्रश्न घेऊन नितीन देशमुख यांनी या गावांतील पाणी एका टँकरमध्ये जमा करून फडणवीसांच्या निवासस्थानी जाण्याचं आंदोलन सुरु केलंय.
अकोला, अमरावतीच्या या पट्ट्यातील 3 महिन्यांचं बाळ जे पाणी पितं, तेच पाणी देवेंद्र फडणवीस यांना आम्ही प्यायला देणार आहोत. तेच पाणी अंघोळीसाठी देणार आहोत, तेव्हा त्यांना आमची समस्या लक्षात येईल, अशी भूमिका नितीन देशमुख यांनी मांडली आहे. मात्र या पदयात्रेची परवानगी न घेतल्याने आमदार नितीन देशमुख अडचणीत सापडले आहेत.