‘नकली शिवसेनेचे अध्यक्ष ठाकरे सोनिया गांधींच्या भीतीने…’, अमित शाह यांचा घणाघात
"नकली शिवसेना अध्यक्ष काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या भीतीने प्राण प्रतिष्ठाला गेले नाहीत. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनाही निमंत्रण दिलं. पण त्यांनी तब्येत खराब असल्याचं सांगत जाणार नाही असं सांगितलं. आता निवडणुकीत कसं फिरत आहेत?", अशी टीका अमित शाह यांनी केली.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना महायुतीकडून अमरावती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली आहे. नवनीत राणा यांच्या प्रचाराच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज अमरावतीत सभा आयोजित करण्यात आली. या सभेत अमित शाह यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. “आपल्या इथे उमेश कोलेची हत्या झाली. सो कॉल्ड हिंदू हितरक्षक उद्धव ठाकरेंनी काहीच केलं नाही. उद्धव ठाकरे तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व संस्कार सोडले. मी तुम्हाला सांगू इच्छितो, आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार घेऊन पुढे गेले आहेत आणि महाराष्ट्रात आज आमचं सरकार आहे. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे. आता कुठल्याच उमेशची हत्या होऊ शकत नाही. कुणाची हिंमत नाही”, असं अमित शाह म्हणाले.
“येणाऱ्या 26 तारखेला कमळच्या चिन्हाचं बटण दाबणार ना? अरावतीकरांना मी आवाहन करु इच्छितो की, कमळाचं बटण इतकं जोरात दाबा की बटण अमरावतीत दाबलं जाईल आणि करंट इटलीत लागेल”, असा टोला अमित शाह यांनी लगावला. “तुमचं प्रत्येक मत या देशाला दहशतावादापासून, नक्षलदावापासून मुक्त करण्यासाठी जात आहे. तुमचं प्रत्येक मत संसारमध्ये तिसऱ्या नंबरची अर्थतंत्र बनवायला जात आहे. तुमचं प्रत्येक मत देशप्रेमी आणि देशविरोधीच्या लढाईत देशप्रेमीच्या हिताला जात आहे. तुमचं प्रत्येक मत परिवारचं राज्य आणि रामराज्याच्या लढाईसाठी लढणाऱ्यांमध्ये रामाराज्याच्या दिशेला जाईल. 10 वर्षात नरेंद्र मोदींनी या देशाच्या विकासासाठी भरपूर कामे केली आहेत. काही कामे असे आहेत जे मोदींच्या ऐवजी होऊच शकत नव्हते”, असा दावा अमित शाह यांनी केला.
‘नकली शिवसेनेचे अध्यक्ष ठाकरे सोनिया गांधींच्या भीतीने…’
“मोदी सरकारने अयोध्येत राम मंदिराचं बांधकाम करुन दाखवलं. काँग्रेसवाल्यांनी 70 वर्षांपर्यंत राम मंदिराचं काम अडकवून ठेवलं होतं. मोदींनी पाचच वर्षात केसही जिंकली, भूमीपूजनही केलं, आणि मंदिराची प्राण प्रतिष्ठादेखील केली. हे स्वत:ला शिवसेनेचा अध्यक्ष मानणारे उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिलं, नकली शिवसेना अध्यक्ष काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या भीतीने प्राण प्रतिष्ठाला गेले नाहीत. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनाही निमंत्रण दिलं. पण त्यांनी तब्येत खराब असल्याचं सांगत जाणार नाही असं सांगितलं. आता निवडणुकीत कसं फिरत आहेत? काँग्रेस नेते राहुल गांधींनाही निमंत्रण दिलं. या लोकांनी राम मंदिराचं बांधकाम रोखून ठेवलंच, प्राण प्रतिष्ठाच्या कार्यक्रमाला न येऊन भगवान श्रीरामांचा अपमान केला”, असा घणाघात अमित शाह यांनी केला.