धक्कादायक | अमरावतीत मतमोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू, काय घडलं?
अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणुकीतील मतमोजणी करण्यासाठी सर्वाधिक वेळ लागला. तब्बल 30 तासांच्या मोजणीनंतर हा निकाल हाती आला.
स्वप्निल उमप, अमरावतीः विधान परिषद निवडणुकीत (MLC Election) अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निकालांकडे (Election result) सर्वांचं लक्ष लागलं होतं. कारण पाच पैकी इतर चार जागांवरील निकाल गुरुवारी रात्रीच लागले. मात्र अमरावतीचा (Amravati) निकाल लागण्यासाठी शुक्रवारची दुपार उजाडली. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयाची बातमी आली. त्यानंतर काही वेळातच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. या विभागात मतमोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. काल रात्री मोजणी झाल्यानंतर कर्मचारी घरी गेले होते. घरी गेल्यानंतर सदर कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
काल काल घडलं?
सदर घटनेविषयी अधिक माहिती अशी की, अमरावती पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीची प्रक्रिया गुरुवारी सुरु होती. रात्री उशीरापर्यंत ही मतमोजणी चालली. दरम्यान, मंडल अधिकारी शाहूराव खडसे हे मतमोजणीनंतर घरी गेले. रात्री अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शाहूराव खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं निदान डॉक्टरांनी केलं. कालपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
30 तास मतमोजणी…
अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणुकीतील मतमोजणी करण्यासाठी सर्वाधिक वेळ लागला. तब्बल 30 तासांच्या मोजणीनंतर हा निकाल हाती आला. गरुवारी रात्री उशीरापर्यंत मोजणी चालली. त्यानंतर सर्व कर्मचारी घरी गेले. शुक्रवारी सकाळपासून पुन्हा एकदा काम सुरु झाले. अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे विजयी झाले तर भाजपचे उमेदवार रणजीत पाटील मोठ्या फरकाने पराभूत झाले.
नाशिकमध्ये कार्यकर्त्याचा मृत्यू
तर गुरुवारी नाशिकमध्ये विधान परिषद निकालाच्या पूर्वसंध्येला युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार याचं अपघाती निधन झालं. नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीत सत्यजित तांबे यांचे खंदे समर्थक असलेल्या मानस पगार यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त होऊ लागली. विजयी उमेदवार सत्यजित तांबे यांनी या दुर्दैवी घटनेनंतर विजयी आनंदोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला.