चंद्रशेखर बावनकुळे यांचा सर्वात मोठा दावा, शरद पवार आणि अजित पवार अखेर एकत्र येणारच?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याबाबत सातत्याने वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. असं असताना आता बावनकुळे यांनी याबाबत महत्त्वाचा दावा केला आहे.
अमरावती | 25 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पवार काका-पुतण्याची चांगलीच चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोल्हापुरात धडाकेबाज भाषण केलं. त्यांनी आपल्या भाषणात भाजपवर सडकून टीका केली. तसेच त्यांनी आपल्याच पक्षाचे नेते आणि अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार यांचं आक्रमक भाषण पाहिल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटलंय, असं दिसत आहे. पण असं असलं तरी राजकारणात पडद्यामागे घडणाऱ्या घडामोडींना देखील विशेष महत्त्व असतं. त्यामुळे आगामी काळात काय घडामोडी घडतात ते महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्याबद्दल मोठा दावा केलाय.
शरद पवार आणि अजित पवार यांच्यात काही दिवसांपूर्वी गुप्त बैठक पार पडली होती. या बैठकीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. याशिवाय राष्ट्रवादी पक्षात फूट पडलेली नाही, अशी शरद पवार यांची भूमिका आहे. तसेच अजित पवार हे आमचे नेते आहेत, अशी भूमिका शरद पवार यांनी आज सकाळी घेतली होती. पण अवघ्या पाच तासात त्यांनी आपल्या वक्त्यापासून घुमजाव केला. त्यानंतर आता बावनकुळे यांनी केलेला दावा चर्चेत आला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमका काय दावा केलाय?
“पवार कुटुंब अत्यंत भावनिक आणि संस्कारमय परिवार आहे. त्यांच्या परिवाराचं नातं एवढं घट्ट आहे की शरद पवार अजित पवारांना सोडू शकत नाहीत आणि अजित पवार शरद पवारांना सोडू शकत नाहीत”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. “शरद पवार काहीही बोलले असतील त्यांच्या ज्या आजच्या भावना आहेत, पण पवार कुटुंब आतापर्यंत एकत्र राहलेलं आहे. त्यामुळे आज ना उद्या त्यांचे मनपरिवर्तन नक्की होईल”, असा मोठा दावा बावनकुळे यांनी केलाय.
“अजित पवारांच्या भूमिकेला शरद पवार टाळू शकणार नाहीत. अजित पवार यांच्या भूमिकेसोबत शरद पवार येतील असा विश्वास आहे”, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
“प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. भाजपच्या कार्यकर्त्याला वाटतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटतं अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना वाटतं की, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत”, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं.