नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी, पत्रात अश्लील भाषेचा उल्लेख
नवनीत राणा यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रात नवनीत राणा यांच्या विरोधात अतिशय खालच्या पातळीच्या आणि अश्लील भाषेचा उल्लेख आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला जातोय.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी प्रचारसभांना सुरुवात झाली आहे. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांचा विविध ठिकाणी दौरा होत आहे. अमरावतीत देखील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बडनेरा विधानसभेचे आमदार रवी राणा हे देखील कामाला लागले आहेत. त्यांच्यासह माजी खासदार नवनीत राणा या देखील प्रचंड काम करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत आपले पती रवी राणा जिंकून यावेत यासाठी नवनीत राणा प्रयत्नशील आहेत. एकीकडे राणा दाम्पत्य निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत तर दुसरीकडे त्यांचं मानसिक खच्चिकरण करण्याचा प्रयत्न अज्ञात इसमांकडून केला जातोय. अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नवनीत राणा यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रात नवनीत राणा यांच्या विरोधात अतिशय खालच्या पातळीच्या आणि अश्लील भाषेचा उल्लेख आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. या प्रकरणी पोलीस काही कारवाई करतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नवनीत राणा यांना जीवे मारण्याचं धमकीचं पत्र आलं असलं तरी त्यांनी आपलं काम सुरुच ठेवलं आहे. राणा दाम्पत्याने आज नवरात्र निमित्ताने त्यांच्या गंगा सावित्री निवास्थानापासून ते अंबा देवी, एकविरा देवी मंदिरापर्यंत अनवाणी पायाने पदयात्रा काढली. राणा दाम्पत्य दरवर्षी दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवमीला विदर्भाचं कुलदैवत असलेल्या अंबा देवीला साकडं घालण्यासाठी पदयात्रा काढत असतात. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, आदिवासी, बेरोजगार यांच्या जीवनात सुख, समृद्धी, शांती यावी यासाठी राणा दाम्पत्याने अंबादेवीकडे साकडं घातलं. यावेळी नवनीत राणा आणि रवी राणा यांनी माध्यमांना देखील प्रतिक्रिया दिली.
नवनीत राणा काय म्हणाल्या?
“मी गेल्यावर्षी अंबादेवीला साकडं घातलं होतं की तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे आणि ते झाले. यावर्षी आमदार रवी राणा हे चौथ्यांदा बडनेरा मतदारसंघातून निवडून यावे आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं पाहिजे, देवेंद्र फडणवीस हे महायुतीचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले पाहिजेत, यासाठी मी अंबादेवीच्या चरणी प्रार्थना करणार आहे”, अशी प्रतिक्रिया माजी खासदार नवनीत राणा यांनी दिली.
आमदार रवी राणा काय म्हणाले?
“आमदार रवी राणा यांनी देखील यावेळी प्रतिक्रिया दिली. राज्यात महायुतीचे सरकार आलं पाहिजे. लाडक्या बहिणींचे पैसे पंधराशेवरून तीन हजार रुपये झाले पाहिजे. शेतकरी आयोजन असताना त्यांना शासनाकडून मदत मिळाली पाहिजे. युवा स्वाभिमान पक्षासाठी आम्ही अमरावती जिल्ह्यात चार जागा मागत आहोत. बडनेरासह दर्यापूर, अचलपूर, मेळघाट या जागा महायुतीमध्ये युवा स्वाभिमान पक्षाला मिळो हे सुद्धा साकडं मी घालणार आहे”, अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली.