गाढवांचा पोळा : महाराष्ट्रात या गावात बैलपोळ्याच्या दिवशी होते गाढवांची पूजा, साज शृंगार आणि घरोघरी पुरणाची पोळी
एवढंच नाही तर बैलांप्रमाणेच, आजच्या दिवशी या गावातील गाढवांकडून कोणतेही काम करवून घेतल्या जात नाही. वर्षभर ते करत असलेल्या कामाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळ्याच्या दिवशी त्यांची पूजाअर्चा करून, त्यांना दरवाजापुढे उभं करण्यात येतं. आजचा दिवस हा या गाढवांचा सन्मान करण्याचा दिवस असतो.
अमरावती – बैलपोळ्याच्या दिवशी जर कुठल्या गावात गाढवांची पूजा (Donkey Pooja)होत असेल तर.. तुम्हाला नक्कीच हे ऐकायला आश्चर्यकारक वाटेल, पण हे प्रत्यक्षात आपल्या महाराष्ट्रात (Maharashtra) घडतं आहे. विदर्भातील अमरावती (Amravati)जिल्ह्यात रासेगावमध्ये आजच्या बैलपोळ्याच्या दिवशीच गाढवांचा पोळा साजरा करण्यात येतो. अचलपूर तालुक्यात असलेलं रासेगाव गाढवांच्या पोळ्यासाठी पंचक्रोशत प्रसिद्ध आहे. आजच्या दिवशी ज्याप्रमाणे बैलांचा साजशृंगार केला जातो, त्याचप्रमाणे गाढवांचा सुद्धा साजशृंगार करून गाढवांना पुरणपोळी, कुरडया,पापड-भजे यांसारखे स्वादिष्ट पदार्थ दिल्या जातात. ज्याप्रमाणे आजच्या दिवशी बैलांचा सन्मान केला जातो, त्याच प्रेमाने या गावात गाढवांचा हा पोळा साजरा करण्यात येतो.
गाढवांच्या पोळ्याची फार जुन्या वर्षांची परंपरा
या गावातील ग्रामस्थ सांगतात की गाढवांचा पोळा या गावात साजरा होण्याची परंपरा फार जुनी आहे. त्यांच्या वाडवडिलांच्या काळापासून हा गाढवांचा पोळा गावात साजरा करण्यात येत असल्याचं ते सांगतात. काही घरांमध्ये २५ वर्षांपूर्वी एक दोन असलेली गाढवं ही आता १० ते १२ च्या संख्येत झाली आहेत. वर्षभर त्यांच्याकडून काम करवून घेत असताना, वर्षातला एक दिवस त्यांचे कोडकौतुक करण्यासाठी साजरा केला जोता, असे या गावातील गृहिणी सांगतात.
गाढवांना पोळ्याच्या दिवशी मिळते विश्रांती
एवढंच नाही तर बैलांप्रमाणेच, आजच्या दिवशी या गावातील गाढवांकडून कोणतेही काम करवून घेतल्या जात नाही. वर्षभर ते करत असलेल्या कामाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळ्याच्या दिवशी त्यांची पूजाअर्चा करून, त्यांना दरवाजापुढे उभं करण्यात येतं. आजचा दिवस हा या गाढवांचा सन्मान करण्याचा दिवस असतो.
ही प्रथा फक्त अमरावती जिल्ह्यातच
अमरावती जिल्ह्यातील रासेगाव येथे भोई समाजातील बांधव मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्य व्यवसायाचा मुख्य भाग हा गाढव आहे. वर्षभर त्या गाढवाच्या मदतीनेच त्यांना काम करावे लागते. ज्याप्रमाणे शेतीत काम करणाऱ्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करत उतर राज्यात बैलपोळा साजरा करण्यात येतो, त्याचप्रमाणे या गावात हा गाढव पोळा साजरा करण्यात येतो. गाढवाचा पोळा भरवण्याची ही प्रथा विदर्भातही फक्त अमरावती जिल्ह्यातच पाहायला मिळते.