अमरावती : प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे. बच्चू कडू यांना आज मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सध्याच्या घडीला मंत्रिमंडळ विस्तार करण्याची क्षमताच नाही, असं मोठं वक्तव्य केलं आहे. तसेच भाजपसोबत गेलेल्या सर्व 50 आमदारांना फक्त विरोधकांकडून त्रास दिला जातोय, असं नाही. तर भाजपकडूनही काही जणांकडून त्रास दिला जात असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला. विरोधकांकडून 50 खोक्यांचा आरोप करुन टीका केली जातेय. तशीच टीका मित्र पक्षाच्या काही जणांकडूनही करण्यात आली, असं बच्चू कडू यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं.
“राज्यात सत्तांतर घडवून आणल्यानंतर गेल्या वर्षभरात घडामोडी पाहिल्यात तर कुभी खुशी, कभी गम सारखी परिस्थिती आहे. काही निर्णय खरंच चांगले घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला दिव्यांग मंत्रालय दिलं. याचा मला आनंद आहेच. पण सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय फार महत्त्वाचे आहेत. सरकारने शेतकऱ्यांसाठी 2 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त भरपाई दिली आहेत. तसेच आताही 1500 कोटींची भरपाई दिली. एकंदरीत आपण सात ते आठ हजार कोटींवर चाललोय”, असं बच्चू कडू म्हणाले.
“महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी मोठी रक्कम नुकसान भरपाई म्हणून या सरकराने दिलेली आहे.
कधीही आणि कुणालाही उपलब्ध होईल असा मुख्यमंत्री राज्याला मिळाला आहे. कदाचित हा उठाव झाला नसता तर मुख्यमंत्री इतक्या स्थानिक पातळीवर येऊन काम करु शकतो हे महाराष्ट्राच्या जनतेला दिसलं नसतं. ही मोठी उपलब्धी आहे”, असा दावा बच्चू कडू यांनी केला.
“50 आमदारांची गळचेपी झालेली आहे. कारण विरोधक 50 खोके घेतले म्हणून आरोप करत आहेत. तर मित्र पक्ष भाजपच्या काही जणांकडून त्रास व्हायला लागला आहे. आता माझ्या मतदारसंघात आमदार रवी राणा यांनी खोके घेतले म्हणून आरोप केला. त्यानंतर आम्ही आवाज उठवला त्यावर भाजपकडून जसं सहकार्य पाहिजे होतं तसं त्याप्रमाणात मिळालं नाही. 50 आमदारांना डिवचलं जाऊ नये. त्यांच्या योगदानातून आपण सत्तेवर आलो याचा विसर पडला की काय? हा एक मोठा फरक जाणवतोय”, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.
“भाजपच्या काही मंत्र्यांकडून विकास कामे थांबवली जात आहेत. ते व्हायला नको, असं मला वाटतं. कारण सन्मान बरोबरीने देणं गरजेचं आहे. असं होऊ नये. कारण एवढा मोठा त्याग करुन, स्वत:ची बदनामी करुन, कारण आमदारांची खूप बदनामी झाली. विरोधकांनी नको तेवढी बदनामी केली. अशा परिस्थितीत तिकडून मारा सुरु असताना इकडूनही झोडपा मारत असतील तर त्या 50 आमदारांनी कुठे जायचं? त्यावरही लक्ष देणं फार गरजेचं आहे”, असं बच्चू कडू म्हणाले.
“मंत्रिमंडळ विस्ताराला वर्षभर वेळ लागणार नाही. विस्ताराच्या दुसऱ्या फेरीत मंत्रिमंडळाची निवड होईल, असं मला वाटलं होतं. पण विस्तार झाला नाही. हे दुर्देव असलं तरी आम्ही त्यामुळे नाराज आहोत, असं काही नाहीय. मंत्रिमंडळ विस्तार होईल. नाही झाला तरी पर्वा नाही. मला असं वाटतं की, आता मंत्रिमंडळ विस्तार हा 2024 नंतरच होईल. ती क्षमता सध्या सरकारमध्ये नाहीय”, असं स्पष्ट वक्तन्य बच्चू कडू यांनी केलं.