Amravati NCP | राष्ट्रवादीचा उद्या अमरावतीत मेळावा, शरद पवार उपस्थित राहणार, देवेंद्र भुयार राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
शेतकरी मेळाव्यात देवेंद्र भुयार यांच्या हकालपट्टीची घोषणा राजू शेट्टी यांनी केली होती. तेव्हापासून भुयार हे आमदार आहेत. पण, त्यांची जवळीकता मात्र राष्ट्रवादीसोबत जास्त आहे. शरद पवार यांचा दौरा असल्यामुळं ते राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अमरावती : देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar ) हे स्वाभिमानीच्या तिकिटावर निवडून आले. पण, गेल्या काही दिवसांपासून त्यांची राष्ट्रवादीची जवळीकता सर्वांना माहीत आहे. उद्या, अमरावती येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) विभागीय मेळावा होणार आहे. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) येणार आहेत. त्यामुळं या मेळाव्याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. या मेळाव्यात देवेंद्र भुयार हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का, याकडं राजकीय लोकांच्या नजरा आहेत. याबद्दल देवेंद्र भुयार यांनी यांना विचारले असता ते म्हणाले, स्वाभिमानीमध्ये विदर्भाची जबाबदारी माझ्याकडे होती. त्यामुळे विदर्भातील आणि मतदार संघातील कार्यकर्त्यांशी बोलून मी राष्ट्रवादीत जायचं की नाही याबाबत निर्णय घेईल.
राष्ट्रवादीच्या मेळाव्याला जाणार
देवेंद्र भुयार म्हणाले, मेळाव्याला शरद पवार येत असतील तर मला तिथं जावचं लागेल. मी उद्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याला जाणार आहे. मी यापूर्वी देखील राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर गेलो आहे. शरद पवार येत असतील तर कुठेही जाऊ. राष्ट्रवादीच्या मेळाव्याच निमंत्रण आलं आहे, असंही भुयार यांनी सांगितलं.
कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
भुयार म्हणाले, मला तिकीट राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून मिळाली होती. त्यामुळे मी तिथे राष्ट्रवादी सहयोगी सदस्य म्हणून पहिल्या दिवसापासून आहेच. राष्ट्रवादीच्या प्रवेशाच अजून काही ठरलं नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असं त्यांनी स्पष्ट केलं. गेल्या काही दिवसांपासून राजू शेट्टी यांच्याशी देवेंद्र भुयार यांचे फारसे सख्य नाही. त्यामुळं शेतकरी मेळाव्यात देवेंद्र भुयार यांच्या हकालपट्टीची घोषणा राजू शेट्टी यांनी केली होती. तेव्हापासून भुयार हे आमदार आहेत. पण, त्यांची जवळीकता मात्र राष्ट्रवादीसोबत जास्त आहे. शरद पवार यांचा दौरा असल्यामुळं ते राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अमरावती विभागाचा राष्ट्रवादीचा मेळावा
शरद पवार दहा एप्रिलला अकोला महानगर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत. मेळाव्याचे आयोजन महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांनी केले आहे. अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ येथील पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.