Prakash Ambedkar : मग तुमचा पक्ष गुंडाळून टाका, प्रकाश आंबेडकर यांचा शरद पवार यांना खोचक सल्ला; असं का म्हणाले?
Prakash Ambedkar attack on Sharad Pawar : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर सध्या आरक्षण बचाव यात्रेनिमित्त महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सध्या आरक्षण बचाव यात्रेनिमित्त राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ओबीसी आरक्षणासाठी आंबेडकर मैदानात उतरले आहे. आरक्षणावरुन राज्यात ओबीसी आणि मराठा समाजात तेढीचे वातावरण असताना त्यांचा दौरा होत आहे. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. मग तुमचा पक्ष गुंडाळून टाका, असा खोचक सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांना दिला आहे. त्यावरून आता वातावरण तापले आहे.
पवारांनी भूमिका स्पष्ट करावी
मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी भूमिका घेतील त्या भूमिकेसोबत आम्ही राहू त्यात कोणत्याही प्रकारचे राजकारण आणणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं होतं, याबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना विचारले असता शरद पवारांनी अगोदर आपल्या पक्षाची काय भूमिका आहे ते सांगावं? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका घ्यावी असे पवार म्हणत असेल तर पवारांच्या पक्षाची गरज काय? तुमचा पक्षच गुंडाळून टाका अस म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांना टोला लगावला.
राजू शेट्टी सोबत जाणार का?
शेतकरी आणि वंचित तसेच सरकार विरोधी भूमिका असणाऱ्या सर्वांची तिसरी आघाडीचा प्रयोग राज्यात करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी ही आघाडी सक्रिय होईल. शेतकरी नेत राजू शेट्टी यांनी तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांना आवाहन केले आहे. त्यावर आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजू शेट्टी यांनी ठोस भूमिका मांडावी, ठोस भूमिका नसताना यावर काय बोलावं, असे आंबेडकर म्हणाले.
रोहित पवारांना लगावला टोला
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आमच्यासोबत यावं अशी आमदार रोहित पवार यांनी खुली ऑफर दिली होती. यावरून प्रकाश आंबेडकर यांनी रोहित पवारांवर निशाण साधला आहे. रोहित पवारांना त्यांच्या आजोबाचा इतिहास माहिती नाही पहिले त्यांनी त्यांच्या आजोबाचा इतिहास बघावा असा टोला आंबेडकर यांनी लगावलाय. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य बघावे मग त्यांनी अध्ययन करावे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.