Ravi Rana : अमरावतीच्या पोलीस आयुक्तांना निलंबित करा, आमदार रवी राणा यांचे देवेंद्र फडणवीस यांना मागणीचे पत्र
पोलिसांनी ही घटना दाबण्याचा प्रयत्न केला. आम्ही उमेश कोल्हे यांच्या कुटुंबीयांना भेटलो. त्यानंतर पोलिसांना विचारणा केली. ते चोरीची घटना असल्याचं सांगत होते. बारा दिवस तपास केल्यानंतरही पोलिसांना सुगावा लागला नाही. याच कारण ते महाविकास आघाडी सरकारच्या दबावाखाली काम करत होते, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला.
अमरावती : अमरावतीमधील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे (Umesh Kolhe) हत्या प्रकरण चांगलंच तापतंय. अमरावती पोलीस आयुक्त डॉ आरती सिंग यांचे निलंबन करा, अशी मागणी आमदार रवी राणा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे पत्राद्वारे केली आहे. अमरावती शहरात मागील काही दिवसांत गुन्हेगारी वाढल्याचा आरोप रवी राणा यांनी केलाय. पोलीस आयुक्त आरती सिंग (Aarti Singh) या महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या दबावात होत्या, असा राणा यांचा आरोप आहे. रवी राणा म्हणाले, उमेश कोल्हे हत्या प्रकरणात अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी दुर्लक्ष केलं. खासदार नवनीत राणा यांनी आरती सिंग यांना विचारलं. या हत्येमागं कारण काय आहे. तेव्हा पोलीस आयुक्तांनी लूटपाट असल्याचं सांगितलं. परंतु, लुटपाटीसाठी ही हत्या केली गेली नसल्याचं समोर आलं. उमेश कोल्हे यांच्या मुलानं पोलिसांना व्हॉट्सअपवरील मेसेजेस दाखविले. तरीही पोलीस त्यांच्याकडं दुर्लक्ष करत होते. पाच आरोपींना अटक केल्यानंतर हत्येमागचं सत्य बाहेर कसं आलं नाही, असा आरोप राणा यांनी केला.
पोलिसांना सुगावा कसा लागला नाही
उदयपूरच्या घटनेनंतर अमरावतीतही घटना घडली. पण, पोलिसांनी ही घटना दाबण्याचा प्रयत्न केला. आम्ही उमेश कोल्हे यांच्या कुटुंबीयांना भेटलो. त्यानंतर पोलिसांना विचारणा केली. ते चोरीची घटना असल्याचं सांगत होते. बारा दिवस तपास केल्यानंतरही पोलिसांना सुगावा लागला नाही. याच कारण ते महाविकास आघाडी सरकारच्या दबावाखाली काम करत होते, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला. एनआयए ही तपास यंत्रणा आल्यानंतर पोलीस आयुक्तांना कशी जाग आली, असंही नवनीत राणा म्हणाल्या.
8 जुलैला सातही आरोपी मुंबई कोर्टात
उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणाचा संपूर्ण तपास आता एएनआय या राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला आहे. अटक केलेल्या सर्व सातही आरोपींचा ताबा आता NIA कडे राहणार आहे. सातही आरोपींना चार दिवसांची NIA ची ट्रांझिग रिमांड घेतले. 8 जुलै रोजी मुंबई NIA कोर्टात सातही आरोपीला हजर करणार आहेत. अमरावती पोलिसांचा तपास न्यायालयाने NIA कडे दिलाय.