रामदास आठवले म्हणजे आंबेडकरी चळवळीला लागलेला कलंक; आनंदराज आंबेडकर यांची जहरी टीका
रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी आज कोरेगाव भीमा विजयस्तंभाला अभिवादन करत येथील तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रामदास आठवले यांच्यावर घणाघाती टीका केली. आठवले हे चळवळीला लागलेले कलंक आहेत, असं आनंदराज म्हणाले.
पुणे: रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर जहरी टीका केली आहे. रामदास आठवले म्हणजे आंबेडकरी चळवळीला लागलेला कलंक आहे, अशी टीका आनंदराज आंबेडकर यांनी केली आहे.
भीमा कोरेगावला मोठ्या संख्येने या
रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी आज कोरेगाव भीमा विजयस्तंभाला अभिवादन करत येथील तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रामदास आठवले यांच्यावर घणाघाती टीका केली. आठवले हे चळवळीला लागलेले कलंक आहेत, असं आनंदराज म्हणाले. तसेच आनंदराज आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर टीका करत सरकार ओमिक्रॉनची भीती दाखवून निवडणुका पुढे ढकलू पाहत असल्याचा आरोप केला. ओमिक्रॉनचा धोका जास्त नसल्याने या वर्षीचा शौर्य दिन हा लाखोंच्या संख्येच्या जनसमुदायाने संपन्न होणार असल्याचं सांगतानाच कोरोना हा अजिबात गंभीर विषाणू नाही. त्यामुळे भीमा कोरेगावला मोठ्या संख्येने या असं आवाहन त्यांनी केलं.
तो संबंध जोडणे दुर्देव
नक्षलवाद, आनंद तेलतुंबडे आणि मिलिंद तेलतुंबडे आदींबाबतही त्यांनी आपली भूमिका मांडली. भीमा कोरेगाव प्रकरणात नक्षलवाद्यांचा हात आहे म्हणणं हा हास्यास्पद प्रकार आहे. नक्षलवाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घराचा संबंध जोडणे हा प्रकार दुर्दैवी आहे. भाऊ चोर आहे म्हणून सगळेच चोर असं म्हणण्याचा हा प्रकार आहे, असं ते म्हणाले. आनंद आणि मिलिंद तेलतुंबडे यांच्या कामाचा संबंध लावणं चुकीचं आहे. एका आईची दोन मुलं सारखं काम करतात असं म्हणायचं का? ते नक्षलवादी होते असं सरकारचं मत आहे. त्यामुळे देशविरोधी कारवाया केल्या असतील तर शिक्षा झाली पाहिजे मात्र तसं नसेल तर उगाच कुणालाही शिक्षा होऊ नये, असं ते म्हणाले.
वंचित बी टीम नाही
वंचित आघाडीही भाजपची बी टीम आहे का? असा सवाल केला असता कुणीही वेगळा पर्याय देऊन उभं राहिलं तर हा आरोप होतो. उद्या मी पण उभा राहिलो तर माझ्यावरही आरोप होईल. पण आपण आपल्या पायावर उभे राहिलं पाहिजे म्हणजे आपल्याला आपली ताकत लक्षात येईल, असं त्यांनी सांगितलं. मला मोठ्या आघाड्यांकडून प्रस्ताव आलेले नाहीत. पण तसे प्रस्ताव आले तर विचार करू, असं सूचक विधानही त्यांनी केलं.
संबंधित बातम्या: