सचिन वाझे यांच्या बॉम्बगोळ्यावर अनिल देशमुख यांचे उत्तर, म्हणाले…
Sachin Waze and Anil Deshmukh: देवेंद्र फडणवीस यांची ही नवीन चाल आहे. आपण काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे आता सचिन वाझे मार्फत माझ्यावर आरोप केले जात आहे. परंतु सचिव वाझे गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे.
Anil Deshmukh On Sachin Waze : मुंबई पोलीस दलातून बडतर्फ केलेला अधिकारी सचिन वाझे याने शनिवारी महाराष्ट्रातील राजकारणात बॉम्बगोळा टाकला. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सचिन वाझे याने गंभीर आरोप केले. आपले आरोप सिद्ध करण्यासाठी नार्को टेस्ट करण्याची तयारी दर्शवली. अनिल देशमुख यांच्यापर्यंत त्यांच्या पीएमार्फत पैसे जात होते. या प्रकाराबाबत केंद्रीय गुन्हे अन्वेषन विभागाकडे (सीबीआय) पुरावे सुद्धा आहेत. यासंदर्भात आपण स्वत: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्याची माहिती दिली आहे, असे सचिन वाझे याने म्हटले. त्यानंतर अनिल देशमुख यांनी तातडीने पत्रकार परिषद देऊन आरोप फेटाळले. तसेच आरोपाच्या टायमिंगवर प्रश्न उपस्थित केला.
काय म्हणाले अनिल देशमुख
माध्यमांशी बोलताना अनिल देशमुख म्हणाले, की देवेंद्र फडणवीस यांची ही नवीन चाल आहे. आपण काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे आता सचिन वाझे मार्फत माझ्यावर आरोप केले जात आहे. परंतु सचिव वाझे गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. त्याच्या कोणत्याही वक्तव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. दोन खुनाच्या प्रकरणात सचिन वाझे कारागृहात आहे.
मी चार, पाच दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते आणि सत्य परिस्थिती जनतेसमोर आणली होती. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी कशा पद्धतीने प्रतिज्ञापत्र पाठवले होते. तीन वर्षांपूर्वी ते प्रतिज्ञापत्र मला पाठवल्यावर आपण त्याला नकार दिला होता. मी तुरुंगात जाईल पण त्यांच्याविरोधात प्रतिज्ञापत्र देणार नाही, असे म्हटले होते.
आपण केलेल्या त्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे याला हाताशी धरल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. परंतु देवेंद्र फडणवीस यांना मुंबई उच्च न्यायालयाने काय म्हटले ते माहीत नाही का? त्याची (सचिन वाझे) गुन्हेगारी स्वरुपाची पार्श्वभूमी आहे. यामुळे त्याच्या वक्तव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. परंतु त्याला हाताशी धरुन माझ्यावर आरोप लावत आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला मी सांगू इच्छितो, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.