भाजपमध्ये जाण्याआधीच एकनाथ खडसे यांना राज्यपाल करण्यास विरोध, सरळ राष्ट्रपतींना घातले साकडे
eknath khadse: राष्ट्रपतींना लिहिलेल्या ६ पानी पत्रात अंजली दमानिया यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध प्रलंबित असलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची माहिती दिली आहे. नैतिक पतनाचा आरोप असलेल्या व्यक्तीला राज्यपाल बनवता येत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले आमदार एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही जात आहेत. एकनाथ खडसे यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर एकनाथ खडसे यांना राज्यपाल केले जाण्याची शक्यता आहे. या बातम्यांमुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे. एकनाथ खडसे यांना राज्यपाल करु नये, अशी मागणी त्यांनी सहा पानी पत्रातून केली आहे. त्यात त्यांनी एकनाथ खडसे यांच्या विरोधात प्रलंबित असलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची माहिती दिली आहे.
काय आहे पत्रात
अंजिल दमानिया यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोणत्याही राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या राज्यपालपदी नियुक्त करण्याची शिफारस आल्यास ती नाकारावी. यासंदर्भात अंजली दमानिया यांनी ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे की, घटनेच्या कलम 60 नुसार माननीय राष्ट्रपती संविधान आणि कायद्याचे जतन, संरक्षण आणि रक्षण करण्यासाठी त्यांच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम प्रयत्न करतील आणि ते स्वतःला सेवेसाठी समर्पित करतील अशी अपेक्षा आहे.
खटल्यांची दिली माहिती
राष्ट्रपतींना लिहिलेल्या ६ पानी पत्रात अंजली दमानिया यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध प्रलंबित असलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची माहिती दिली आहे. नैतिक पतनाचा आरोप असलेल्या व्यक्तीला राज्यपाल बनवता येत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोणत्याही राज्याच्या/ केंद्रशासित प्रदेशाच्या राज्यपालपदी नियुक्त करण्याची कोणतीही शिफारस नाकारण्याचे आवाहन आज मी माननीय राष्ट्रपतींना केले आहे. त्याची प्रत मी माननीय पंतप्रधान, गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनाही पाठवली आहे.
राष्ट्रपतींना… pic.twitter.com/MtL6Crz0k6
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) April 9, 2024
खडसे यांना भाजपमधून विरोध
एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये घेण्यास पक्षातून विरोध असल्याचे संकेत आहे. जळगाव जिल्ह्यातील एकनाथ खडसे यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले गिरीश महाजन यांनी यासंदर्भात उपाहासात्मक प्रतिक्रिया दिली होती. खडसे यांचे संबंध दिल्लीत आहे. आम्ही छोटे कार्यकर्ते आहोत, असे ते म्हणाले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपणास हे प्रकरण माहीत नाही, वरिष्ठ नेत्यांकडून आदेश आल्यास त्यांचे स्वागत करु, असे म्हटले होते. यामुळे एकनाथ खडसे यांची भाजपमधील वाटचाल अवघडच असणार आहे.