खडसेंनी माझा सर्वाधिक छळ केला, माझं नाव घ्याल तर याद राखा, सोडणार नाही; दमानिया यांचा इशारा
मी नितीन गडकरी आणि छगन भुजबळ यांच्याविरोधातही लढले. पण एकनाथ खडसे यांनी जेवढा माझा छळ केला, तेवढा कोणी केला नसेल, असं सांगतानाच यापुढे कोणत्याही पत्रकार परिषदेत माझं नाव घेतलं तर याद राखा, तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिला.
मुंबई: माझा लढा हा भ्रष्टाचाराविरोधात होता. कोणत्याही एका व्यक्तिविरोधात नव्हता. मी नितीन गडकरी आणि छगन भुजबळ यांच्याविरोधातही लढले. पण एकनाथ खडसे यांनी जेवढा माझा छळ केला, तेवढा कोणी केला नसेल, असं सांगतानाच यापुढे कोणत्याही पत्रकार परिषदेत माझं नाव घेतलं तर याद राखा, तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिला. (anjali damania reaction on eknath khadse allegations)
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या दाव्याचं खंडन करतानाच खडसे यांच्याविरोधील विनयभंगाचा खटला संपलेला नसल्याचं स्पष्ट केलं. आरोपपत्रच अजून दाखल झालेलं नाही तर खटला संपला कसा? असा सवाल करतानाच खडसे याबाबत धांदात खोटं बोलत आहेत, असा दावा दमानिया यांनी केला. खडसे हे खूनशी प्रवृतीचे आहेत. मी भाजपचे नेते नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याविरुद्धही लढले. पण खडसेंनी जेवढा छळ केला तेवढा कुणीच केला नसेल, असं त्या म्हणाल्या.
खडसेंनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्याबद्दल अश्लील वक्तव्य केलं. वाट्टेल ते बोलले. त्यामुळे वाकोला पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात असं वक्तव्य शोभणारं नाही. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठीच एफआयआर दाखल केला, असंही त्या म्हणाल्या. मी दाखल केलेल्या एफआयआरवर पुढे काहीही झालं नाही. त्याला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच कारणीभूत आहेत. याप्रकरणात फडणवीसांनी सोयीचं राजकारण केलं. कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्यांबाबत राजकारणी असंच राजकारण करतात, असं त्या म्हणाल्या. खडसेंवरील विनयभंगाचा गुन्हा संपलेला नाही. तरीही कालही ते वृत्तवाहिन्यांवरून धांदात खोटे बोलले. त्यामुळे माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
अमृता फडणवीसांबद्दलची वक्तव्ये खपवून घेतली असती का?
यावेळी दमानिया यांनी थेट फडणवीस यांच्यावरच हल्ला केला. ती बाई गोंधळ घालत होती म्हणून गुन्हा दाखल करावा लागला, असं फडणवीस म्हणाल्याचे खडसे यांनी वृत्तवाहिन्यांवर सांगितलं. अमृता फडणवीस यांच्याबद्दल खडसेंनी अशीच वक्तव्ये केली असती तर फडणवीस असंच म्हणाले असते का? एखाद्या मुख्यमंत्र्याला अशी भाषा शोभते का? असा सवालही त्यांनी केला.
याद राखा सोडणार नाही
खडसे माझ्या विरोधात जेवढे बोलतील तेवढी मी त्यांच्याविरोधात खंबीरपणे लढेल. तुम्हाला कोणत्या पक्षात जायचं ते जा. त्याच्याशी मला काहीही घेणंदेणं नाही. पण याद राखा, पुन्हा जर पत्रकार परिषदांमध्ये माझं नाव घेतलं तर मी सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. (anjali damania reaction on eknath khadse allegations)
संबंधित बातम्या:
खडसेंना राष्ट्रवादीत मंत्रिपद मिळेल, पण त्यांच्यासोबत कोणीच जाणार नाही
खडसेंच्या अॅक्शनमुळे राष्ट्रवादीची चांदी, हळूहळू ‘असा’ लागेल भाजपच्या गडाला सुरूंग
…तर टीआरपी घोटाळा सीबीआयकडे गेला असता; अनिल देशमुख यांचा दावा
Non Stop LIVE Update