बीडमध्ये वेश्याव्यवसायाचं मोठं रॅकेट? अंजली दमानियांनी बाहेर काढलं नवं प्रकरण; थेट व्हिडीओ…
संतोष देशमुख हत्याप्रकरणी गुन्हेगारांना शिक्षा व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सातत्याने करत आहेत. असे असतानाच आतात त्यांनी बीड जिल्ह्यातील वेश्याव्यवसायाचं मोठं प्रकरण समोर आणलं आहे.

Beed Crime : गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. या जिल्हात झालेल्या हत्या प्रकरणांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. यातील काही हत्याप्रकरणांची चौकशी चालू आहे. तर काही प्रकरणं न्यायप्रविष्ट आहेत. याच हत्येप्रकरणी गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा करावी, अशी मागणी अंजली दमानियांनी सातत्याने केलेली आहे. असे असतानाच आतात त्यांनी बीड जिल्ह्यातील वेश्याव्यवसायाचं मोठं प्रकरण समोर आणलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी या प्रकरणाशी संबंधित व्हिडीओ गृहमंत्री तसेच गृहराज्यमंत्र्यांना पाठवल्यानंतर पोलिसांनी रेड टाकली आहे, याबाबतची माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे.
वेश्याव्यसायाचे रॅकेट, मला व्हिडीओ…
अंजली दमानिया नाशिकमध्ये बोलत होत्या. यावेळी बोलत असताना त्यांनी बीडमधील वेश्याव्यवसायाच्या रॅकेटबद्दल माहिती दिली. “नाशिकला मी वेगळ्या कारणासाठी आले होते. सगळ्यांना फक्त भेटून मी निघणार होते. पण मला महत्त्वाची माहिती द्यायची आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात उरी शिवार नावाचे गाव आहे. तिथे एक वेश्या व्यवसायाचं रॅकेट सुरू होतं. त्याचे व्हिडिओ मला आले. ते मी गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले,” अशी स्फोटक माहिती दमानिया यांनी दिली.
पोलिसांनी काही विचित्र गोष्टी पाहिल्या
पुढे बोलताना, “हे व्हिडिओ पाठवून या प्रकरणी रेड करावी. तेथे अशा प्रकारचे कृत्य होताना दिसत असेल तर कारवाई व्हावी, अशी मागणी मी केली. माझ्या मागणीनंतर काल रात्री त्या भागात रेड टाकण्यात आली. तेथे पोलिसांनी काही विचित्र गोष्टी होताना पाहिल्या. तिथे वेश्याव्यवसाय चालू होता हे कन्फर्म झालं. या प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय,” असेही दमानिया यांनी सांगितले. या प्रकरणात वेश्या व्यवसाय पाहणाऱ्या व्यवस्थापकाच्या मुलालादेखील अटक करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
दमानियांनी लावून धरले होते संतोष देशमुख हत्या प्रकरण
दरम्यान, याआधी अंजली दमानिया यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचा पाठपुरावा केला होता. त्यांनी बीडचा दौरा करून देशमुख कुटुंबीयांना न्याय देण्याचीही मागणी केली होती. त्यानंतर आता त्यांनी बीडमधील हे वेश्याव्यवसायाचे रॅकेट बाहेर काढले आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.