“ज्या रंगाचा चष्मा असतो, तसंच जग दिसतं”, अण्णा हजारेंचा संजय राऊतांना जबरदस्त टोला, उद्धव ठाकरेंवरही घणाघात
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील आम आदमी पक्षाच्या पराभवावरून अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या टीकेलाही अण्णा हजारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. तब्बल २७ वर्षांनी दिल्लीत भाजपला सत्ता मिळाली. दिल्ली विधानसभेतील 70 पैकी 48 जागांवर भाजपने विजय मिळाला. तर ‘आप’ला 22 जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे दिल्लीकरांनी भाजपला संधी देत ‘आप’ला नाकारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यावरुन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. मी अरविंद केजरीवाल यांना सांगितलं होतं पण त्यांनी दारुवर लक्ष केंद्रीत केलं. त्यांच्या डोक्यात पैशाची, सत्तेची हवा गेली. त्यामुळे त्यांचा पराभव झाला, असे अण्णा हजारे म्हणाले. यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी अण्णा हजारेंवर टीका केली होती. आता या टीकेला अण्णा हजारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काहींनी झोपेतून उठून प्रतिक्रिया दिली – उद्धव ठाकरे
“दिल्ली विधानसभेचा निकाल हा खोटा पराभव असून तो निकाल मी मानत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. तसेच दिल्लीत केजरीवालांचा पराभव झाला तेव्हा काहींनी झोपेतून उठून प्रतिक्रिया दिली”, असा टोला उद्धव ठाकरेंनी अण्णा हजारेंना नाव न घेता लगावला होता. आता यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आपण कशाला त्यावर बोलायचं?
“पत्रकारांनी मला प्रश्न विचाराला म्हणून मी उत्तर दिलं. नाहीतर मी कधी बोलत नाही. पण सर्व पत्रकारांनी त्याची प्रशंसा केली. एखादा माणूस चुकला असेल तर चुकू द्यायचं. आपण कशाला त्यावर बोलायचं?” असे खोचक उत्तर अण्णा हजारेंनी दिले.
संजय राऊतांची टीका
“अण्णा हजारे यांना महात्मा करण्याचे काम अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांनी केले. अण्णा हजारे यांनी दिल्ली कधी पाहिली असती? रामलीला मैदान, जंतर-मंतर रोड कधी पाहिला असता? त्यावेळी आंदोलनाला जो काही आवाका दिला त्यानंतर ते देशाला माहिती झाले, नाही तर ते राळेगणचे दैवत होते. महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे इतके स्फोट झाले. मोदी सरकार असो किंवा शिंदे-फडणवीसांचे सरकार असेल, त्यावेळी अण्णांनी राळेगणमध्ये कूसही बदलली नाही, हे दुर्दैवाने सांगायला लागत आहेत. भ्रष्ट सरकारच्या बाजूने ते उभे राहिले. अण्णा हजारे यांची भूमिका संशयास्पद आहे”, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली होती.
अण्णा हजारेंचे प्रत्युत्तर
यावर अण्णा हजारेंनी टीका केली. “ज्या रंगाचा चष्मा असतो, त्या रंगाचे जग दिसते. चष्माच त्या रंगाचा आहे, त्यामुळे जग दिसणारच तसं, आपण कशाला काय बोलायचं”, असे अण्णा हजारेंनी म्हटले.