Arnab Goswami Arrest : सोनिया सेना आणखी किती गळे दाबणार? कंगनाचा शिवसेनेवर हल्लाबोल
रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणावरुन अभिनेत्री कंगना रनौत हिने शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
मुंबई : रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. पनवेल पोलीस चौकशीसाठी आज त्यांच्या घरी पोहोचले असता, त्यांनी पोलिसांशी दीड तास हुज्जत घातली. त्यानंतर अर्णव गोस्वामी (Arnab Goswami) यांना पोलिसांनी अटक केली. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणावरुन आता अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
अर्णव गोस्वामी अटक प्रकरणानंतर कंगनाने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने म्हटले आहे की, “मला महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारायचा आहे की, आज तुम्ही अर्णव गोस्वामी यांच्या घरी जाऊन त्यांना मारलंत, त्यांना त्रास दिलात, तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात, अजून किती लोकांचे गळे दाबणार आहात? तुम्ही अजून किती लोकांचा आवाज बंद कराल, सोनिया सेना किती आवाज बंद करणार आहे? परंतु हा आवाज वाढत जाणार आहे”.
कंगना पुढे म्हणाली की, “स्वातंत्र्यासाठी, अधिकारांसाठी ज्या लोकांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत असे अनेक लोक शहीद झाले आहेत. तुम्ही एक आवाज बंद कराल, तर अनेक आवाज उठतील. तुम्हाला कोणी पेंग्विन म्हटल्यावर राग का येतो? लोक तुम्हाला पप्पू सेना म्हणतात तेव्हा तुम्हाला राग येतो. तुम्ही पप्पूसारखं काम कराल तर तुम्हाला पप्पूसेनाच म्हणतील. सोनिया सेना म्हटल्यावर तुम्हाला राग येतो, परंतु तुम्ही सोनिया सेनेचे लोक आहातच”.
Message for Maharashtra government @republic #Arnab #ArnabWeAreWithYou #ArnabGoswami pic.twitter.com/AJizRCitS7
— Kangana Ranaut (@KanganaTeam) November 4, 2020
2018 सालात अलिबाग येथील इंटिरिअर डिझायनरने आत्महत्या केली होती, त्या प्रकरणात अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी या गुन्ह्याचा तपास अलिबाग पोलिसांकडून काढून रायगड जिल्हा पोलिसांच्या लोकल क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला होता. या तपासाबाबत रायगड पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. यापूर्वी अर्णव गोस्वामी यांची चौकशी झाली होती, पण कारवाई झाली नव्हती. कलम 306 आणि 34 अंतर्गत अन्वय गोस्वामीला अटक करण्यात आली आहे.
Arnab Goswami says that Mumbai Police physically assaulted his mother-in-law and father-in-law, son and wife. Mumbai police also assaulted Arnab Goswami as per video played out on Republic TV (Screenshot of Republic TV) pic.twitter.com/kFaDoopAAh
— ANI (@ANI) November 4, 2020
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अक्षता नाईक यांच्या तक्रारीची दखल घेत 26 मे 2020 रोजी सांगितलं होते की, “आज्ञा नाईक (अन्वय नाईक आणि अक्षता नाईक यांची मुलगी) यांनी अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिकनं पैसे थकवल्यानं वडील आणि आजीनं आत्महत्या केल्याच्या प्रकरणाची रायगड पोलीस तपास करत नाहीत, अशी तक्रार केली. त्यानंतर मी सीआयडीला या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.”
काय आहे प्रकरण?
अन्वय नाईक (53) यांनी शनिवारी 5 मे 2018 रोजी अलिबाग तालुक्यातील कावीर येथील फार्म हाऊसवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांची आई कुमुद नाईक (84) त्यांचाही मृतदेह तेथेच आढळून आला होता. अन्वय यांची कॉनकॉर्ड कंपनी इंटेरिअर डिझायनरचे काम करते. अन्वय यांच्या कंपनीने रिपब्लीक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांच्यासाठी काम केले होते. केलेल्या कामाचे पैसे त्यांच्याकडून सातत्याने अन्वय यांनी मागितले होते. मात्र, अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सरडा ते देण्यास टाळाटाळ करत होते, तर दुसरकडे अन्वय यांनी ज्या व्यापारी, व्यावसायिक यांच्याकडून माल उचलला होता त्यांनीही पैशाचा तगादा लावला होता, परंतु समोरून पैसे येत नसल्याने अन्वय यांना नैराश्य आले असावे असा अंदाज आहे.
मुंबईतील सुप्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येनंतर उद्योग जगत चांगलेच हादरून गेले आहे. नाईक यांच्या सुसाईड नोटमध्ये रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांची नावे समोर आल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. रायगड पोलिसांसाठी आता ही हायप्रोफाईल केस झाल्यामुळे त्यांनी अन्वय यांच्या कॉनकॉर्ड डिझायनर कंपनीच्या विविध कार्यालयांची तपासणी सुरू केली आहे. त्यानुसार अहवाल आल्यानंतरच तपासाची पुढील दिशा मिळण्यास मदत होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अन्वय नाईक यांच्या कंपनीनं अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीचा स्टुडिओ उभारला होता. याच कामाचे अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यानं अन्वय नाईक यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा आरोप अक्षता नाईक यांचा आहे.
#WATCH Republic TV Editor Arnab Goswami detained and taken in a police van by Mumbai Police, earlier today pic.twitter.com/ytYAnpauG0
— ANI (@ANI) November 4, 2020
विशेष तपास पथक
हाय प्रोफाईल केसमुळे रायगड पोलिसांनी तपासासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांचे विशेष तपास पथक तयार केले. सुसाईड नोटमध्ये नमूद केलेल्या आर्थिक व्यवहारांची खातरजमा करण्यासाठी हे तपास पथकाने अन्वय यांच्या मुंबईतील कार्यालयाची तपासणी केली. तपासणीदरम्यान तपासाची पुढील दिशा निश्चित होण्यास चांगलीच मदत मिळाली असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
संबंधित बातम्या
रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
(Arnab Goswami Arrest : How many more people will Sonia Sena strangle? Kangana Ranaut attacks Shiv Sena)