‘लातूरला एक पडला, दुसरा निसटता निसटता निघाला’, अशोक चव्हाण यांची अमित देशमुख, धीरज देशमुख यांच्यावर टीका
भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण भोकर विधानसभेतून विजय झाल्यानंतर आज अशोक चव्हाण यांनी लेकीसह भोकर मतदारसंघात आभार दौरा केला. यावेळी बोलताना अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या नेत्यावर चौफेर फटकेबाजी केली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांचा दारुण पराभव झाला आहे. विशेष म्हणजे अनेक दिग्गज नेत्यांना या निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं. यामध्ये संगमनेर मतदारसंघातून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, लातूर ग्रामीणमधून अमित देशमुख यांचा पराभव झाला. तर अमरावतीच्या तिवसा मतदारसंघात यशोमती ठाकूर यांचा पराभव झाला. महायुतीने अनेक दिग्गज नेत्यांना या निवडणुकीत घाम फोडला. यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचादेखील समावेश आहे. नाना पटोले यांचा अटीतटीच्या लढतीत साकोलीमधून केवळ 152 मतांनी विजय झाला. या निकालानंतर भाजप नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस नेत्यांवर सडकून टीका केली आहे. आपल्याला काँग्रेस पक्षात असताना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला ते सर्व साफ झाले, असा घणाघात अशोक चव्हाण यांनी केला आहे.
अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले?
भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण भोकर विधानसभेतून विजय झाल्यानंतर आज अशोक चव्हाण यांनी लेकीसह भोकर मतदारसंघात आभार दौरा केला. यावेळी बोलताना अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या नेत्यावर चौफेर फटकेबाजी केली. प्रचार काळात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी भोकर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारासाठी सहभाग घेतला होता. लातूरचा एक पडला आणि दुसरा निसटता निसटता निघाला, असं म्हणत अशोक चव्हाण यांनी अमित देशमुख यांच्यावर टीका केली.
“महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष माझ्या नावाने बोंबलून बोंबलून फिरून गेला आणि दीडशे मतांनी निवडून आला, हे महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहेत”, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. “काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि सगळे साफ झाले. ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले”, अशी खोचक टीका अशोक चव्हाण यांनी केली.