अतिवृष्टीग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करा; बबनराव लोणीकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून पावसामुळे नुकतीच पेरणी करण्यात आलेले सोयाबीनसह इतर पिके पिवळी पडत आहेत.
मुंबई : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून पावसामुळे नुकतीच पेरणी करण्यात आलेले सोयाबीनसह इतर पिके पिवळी पडत आहेत. शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. अगोदरच शेतकरी संकटात असताना पुन्हा अस्मानी संकटाने शेतकऱ्यांवर खूप मोठा आघात केला आहे. अशा परिस्थितीत अतिवृष्टीग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यात यावी, अशी मागणी आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे (Assist farmers with immediate Panchnama of flood prone areas; Babanrao Lonikar demand to CM)
अतिवृष्टी गारपीट ढगफुटी भूकंप यासारखी नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास सरकारने सजग राहून तात्काळ पंचनामे करण्याबाबत आदेश देणे आवश्यक आहे, परंतु महा विकास आघाडी सरकारने अद्याप कोणत्याही प्रकारचे पंचनामे करण्यासंदर्भात आदेश दिले नाहीत. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला महाविकास आघाडी सरकार काहीही करत नाही, ही बाब भाजपा किसान मोर्चाच्या शिष्टमंडळाने आमदार बबनराव लोणीकर यांच्या निदर्शनास आणून दिली, त्यावेळी आपत्ती व्यवस्थापनानुसार शासनाच्या आदेशाची वाट न पाहता जिल्हाधिकारी स्तरावर संबंधित अतिवृष्टीग्रस्त भागाचे पंचनामे करण्याबाबत संबंधित तहसीलदारांना सूचना करण्यात यावी. “शेतकऱ्यांना मदत करायची किंवा नाही ते सरकार ठरवेल तुम्ही पंचनामे तात्काळ करा” अशी सूचनादेखील लोणीकर यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह प्रशासनाला केली आहे
भाजपा किसान मोर्चाचे जालना जिल्हा अध्यक्ष अंकुशराव बोबडे, जिल्हा सरचिटणीस कैलास शेळके, दारासिंग चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब मोरे, नारायण काकडे, रामदास घोंगडे, मंठा तालुका अध्यक्ष अशोकराव वायाळ, जिल्हा चिटणीस केशव येऊल यांच्यासह शिष्टमंडळाने लोणीकर यांची भेट घेऊन अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्याचे अद्याप शासनाने आदेश दिले नाहीत, ही बाब निदर्शनास आणून दिली होती
जालना जिल्ह्यातील मंठा, परतूर, घनसावंगी, जालना ग्रामीण अंबड बदनापूर यासह भोकरदन, जाफराबाद तालुक्यातील काही मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून पिकांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. ग्रामीण भागात काही रस्त्यांवरील पूल वाहून गेले आहेत, तर काही ठिकाणी विजेचे खांब पडल्यामुळे तसेच झाडे उन्मळून पडल्यामुळे गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच गावातील वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे, अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर आपत्कालीन परिस्थितीत पंचनामे करण्याबाबत सर्व तहसीलदारांना सूचना करावी व शासनाच्या आदेशाची वाट न पाहता प्रशासकीय पातळीवर पंचनामे करण्याबाबत पुढाकार घ्यावा, अशी सूचना लोणीकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना केली आहे.
इतर बातम्या
Weather update today : कोकणावर संकट कायम, पुढचे 3 दिवस धोक्याचे, IMD च्या अंदाजाने धाकधूक कायम
(Assist farmers with immediate Panchnama of flood prone areas; Babanrao Lonikar demand to CM)