आणखी एक सरपंच दहशतीमध्ये, थेट पोलिसांना सवाल? ”माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघातय का?”
शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या पागोटे ग्रामपंचायतीच्या सरपंच कुणाल पाटील यांनी हल्ल्यानंतर थेट उरण पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. मात्र त्याची गंभीर दखल न घेता अदखलपात्र तक्रार दाखल करून घेत गावगुंडांना खुलेआम फिरण्याची जणू संधीच दिली होती.
बीड जिल्ह्यातील मयत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्यभर नाही तर देशभर खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर उरण तालुक्यातील पागोटे या गावातील प्रकरण समोर आले आहे. या ठिकाणी सरपंच कुणाल पाटील यांच्यावर गाव गुंडांनी हल्ला केला होता. त्यावेळी दैव बलवत्तर म्हणून ते वाचले. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला. परंतु त्यानंतर पोलिसांकडून त्या गुंडांना अटक होती. त्यामुळे सरपंच कुणाल पाटील यांनी संतोष देशमुख प्रकरणाचे उदाहरण देत प्रश्न विचारला आहे. ”माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघातय का?”, असे त्यांनी म्हटले आहे.
काय घडला होता प्रकार
गावगुंडांच्या दहशतीमुळे ग्रामस्थांना गावात फिरणेही मुश्कील झाले आहे. पागोटे गावचे शिवसेना सरपंच कुणाल पाटील यांनी या दहशतीविरोधात एल्गार पुकारला आणि जनजागृती मोहीम सुरू केली. त्यामुळे हे गुंड संतापले. त्यांनी ९ ऑक्टोबर रोजी कुणाल पाटील यांच्या कार्यालयात घुसून त्यांच्यावर सशस्त्र हल्ला केला. सुदैवाने ते त्यातून बचावले. त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असल्याचे बघताच हल्लेखोर गुंडांनी पळ काढला. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर कुणाल पाटील न्यायालयात गेले. न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल केला. परंतु आरोपींना अजून अटक नाही.
शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या पागोटे ग्रामपंचायतीच्या सरपंच कुणाल पाटील यांनी हल्ल्यानंतर थेट उरण पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. मात्र त्याची गंभीर दखल न घेता अदखलपात्र तक्रार दाखल करून घेत गावगुंडांना खुलेआम फिरण्याची जणू संधीच दिली होती.
पागोटे या गावातील गावगुंड मोकाट आहे. त्यांना अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे कुणाल पाटील म्हणाले, माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघत आहात काय, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत. या गावगुंडांच्या दहशतीमुळे ग्रामस्थ कमालीचे घाबरले आहेय उरण तालुका ‘मस्साजोग’च्या वाटेवर जाण्याची भीती व्यक्त होत आहे. पागोटेवासीयांना न्याय केव्हा मिळणार असा, प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.