औरंगाबादः महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबादमध्ये झालेल्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेत मोठी चोरी झाल्याचे उघड झाले आहे. शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरे यांची ही सभा (MNS Rally) पार पडली. सभेत राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील मनसैनिक हजर होते. यात नांदेडचे मनसे पदाधिकारीदेखील होते. इथेच नांदेडचे (Nanded) मनसे जिल्हाध्यक्षदेखील होते. त्यांच्या गळ्यातील दहा लाख रुपये किंमतीची तब्बल दहा लाख रुपये किंमतीची सोन्याची साकळी चोरट्यांनी पळवल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस आता या प्रकरणी तपास करत आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, नांदेड येथील मनसेचे पदाधिकारी मनिंदरसिंग ऊर्फ माँटीसिंग धरमसिंग जहागीरदार हे 1 मे रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरे यांच्या सभेसाठी आले होते. गर्दीत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 200 ग्रॅमची सोनसाखळी चोरली. काही वेळानंतर माँटीसिंग यांच्या हे लक्षात आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात या या प्रकरणी तक्रार नोंदवली. माँटिसिंग यांच्या गळ्यातील साखळी कुणी चोरली याचा आता पोलीस तपास करत आहेत.
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणातील मुद्दे राज ठाकरे यांना चांगलेच महागात पडले. प्रक्षोभक आणि चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप करीत शहर पोलिसांनी राज ठाकरेंसह त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला. राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी पोलिसांनी 16 अटी टाकल्या होत्या. या अटींचं उल्लंघन होतेय का, हे पाहण्यासाठी पोलिसांनी सभेच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. सोमवारी दिवसभर या चित्रीकरणाची तपासणी करण्यात आली आणि मंगळवारी गुन्हे नोंदवण्यात आले.
राज ठाकरे यांनी 04 मे पर्यंत राज्यातील सर्व मशिदींवरीर भोंगे उतरवण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे औरंगाबादमध्ये याचे काय पडसाद उमटतात, मुस्लिम भाविक यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र आज 04 मे रोजी औरंगाबादमधील मशिदींवर अत्यंत कमी आवाजात अजान लावण्यात आली. तसेच शहरातील बहुतांश मशिदींच्या परिसरात शांततेचं वातावरण दिसून आलं. मनसेनं देखील शहरातील मुस्लिम भाविकांचे आभार मानले. मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी या आशयाचं ट्वीट केलं.