Aurangabad: अतिवृष्टीतही मुख्यमंत्री माझे कुटुंब, माझी जबाबदारीत गुंग, मंत्री रावसाहेब दानवे यांची खोचक टीका
औरंगाबादमधील सोयगाव नगर पंचायतीच्या निवडणूक प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या. यात भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी परस्परांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यावेळी निशाणा साधला.
औरंगाबादः राज्यात आसमानी संकट कोसळलं. अनेक दिवस अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं. अशा स्थितीत तत्काळ मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानात गुंग होते. हे त्रिमुखी सरकार राज्यातील बारा कोटी जनतेला वाऱ्यावर सोडून वसुलीच्या मागे लागले आहेत, अशी खोचक टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केली. रविवारी सोयगाव नगरपंचायत निवडणुकीनिमित्त आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली.
सत्तारांनी माझ्यासमोर सांगावे…
यापुढे भाषणात बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, अब्दुल सत्तार यांनी माझ्यासमोर बसून सांगावे की, सोयगावचा विकास शिवसेनेने केला की भाजपने केला. सोयगावच्या विकासासाठी भाजपने कायम आग्रही भूमिका घेतली आहे. विकास भाजप करतो आणि नारळ मात्र राज्यमंत्री सत्तार फोडतात. त्यामुळे आयत्या पीठावर रेघोट्या मारण्याचे काम इथे सर्रासपणे सुरु असल्याची टीका त्यांनी राज्यसरकारवरही केली.
भाजपच्या थापांना बळी पडू नका- राज्यमंत्री सत्तार
भाजपच्या टीकांना उत्तर देताना राज्यमंत्री सत्तार म्हणाले, निवडणूक आली म्हणून भाजप नेते आता सोयगावात दिसू लागले आहेत. कोरोनाच्या संकटकाळात ही मंडळी होती तरी कुठे, केवळ उद्योगधार्जिणे धोरण आखून सर्वसामान्यांना महागाईचे चटके देण्याचे काम भाजप करू लागले आहे.
सोयगावात प्रचाराच्या तोफा थंडावल्या
सोयगाव नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या. आता मंगळवारी 13 जागांसाठी येथे मतदान होईल. प्रचार थांबल्यानंतर उमेदवार गाठी-भेटींवर भर देत आहेत. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी तसेच भाजप आणि प्रहार संघटनेनं यंदा जोरदार प्रचार केला. रिंगणातील 40 उमेदवारांनी व त्यांच्या प्रचार प्रमुखांनी 13 प्रभाग पिंजून काढले असून आता शहरवासियांचा कौल काय, हे मतदानाअंती 19 जानेवारीला स्पष्ट होईल.
इतर बातम्या-
Nashik| महापालिका निवडणुका लांबणार, अजित पवारांचे संकेत; ओबीसी जनगणना झाल्यावरच रणधुमाळी
Elections: 2019 च्या निवडणुकीत जनतेनं तुम्हाला औकात दाखवून दिलीय, धनंजय मुंडे यांची जहरी टीका