वीजबिल भरा, नाही तर लाईट कट करणार!! औरंगाबादेत महावितरणच्या नावानं नागरिकांना कोण पाठवतंय मेसेजेस?
महावितरणच्या नावानं हे संदेश कोण पाठवतंय, याचा शोध घेतला पाहिजे, अशी मागणी ग्राहकांमधून होतेय. बनावट एसएमएस पाठवणाऱ्यांना शोध महावितरणनेच घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, असे ग्राहकांचे म्हणणे आहे.
औरंगाबादः बनावट मेसेजेसद्वारे (Fake Messages) सामान्य नागरिकांना लुटण्याचे प्रकार सर्रास सुरु असतात. यातच आता महावितरणचे नावही समोर आले आहे.औरंगाबादेत महावितरणच्या (MSEDCL) नावाने असे मेसेजेच पाठवले जात आहेत. ‘आपल्या वीजबिलाच्या पेमेंटमध्ये अडचण असल्याने आज रात्री 9.30 वाजता आपला वीजपुरवठा खंडित (Electricity Cut Off) करण्यात येणार आहे. करिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा’ असे एसएमएस नागरिकांना येत आहेत. या संदेशांनी नागरिकांसोबत महावितरणचीही झोप उडाली आहे. मात्र अशा प्रकारच्या संदेशांना अजिबात प्रतिसाद देऊ नका, या संदेशांचा आमच्याशी काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण महावितरतर्फे देण्यात आले आहे.
औरंगाबादेत अनेकांना संदेश
औरंगाबाद शहरातील अनेक नागरिकांना असे मेसेज आलले आहेत आपल्या वीजबिलात काही अडचण आहे रात्री 9.50 किंवा रात्री 9.30 वाजेपर्यंत सोबत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधा, असे एसएमएस धुमाकूळ घालत आहेत. अनेकांनी यासंदर्भात महावितरणशी संपर्क केला. तर कुणी सदर मोबाइल नंबरवर फोन केला. त्यावर आम्ही इलेक्ट्रिसिटी बोर्डाकडून बोलत असून तत्काळ बिल भरा, अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, असा दम दिला जात आहे. यामुळे अनेकांची चिंता वाढली आहे.
महावितरणकडून कोणते मेसेज येतात?
महावितरणकडून केवळ देखभाव व दुरूस्ती, वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्याचा संभाव्य कालावधी तसेच दरमहा वीजबिलांची रक्कम, वीजबिलाची रक्कम, देय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस आदींची माहिती पाठवण्यात येते. वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून नागरिकांना सध्या पाठवण्यात येणारे संदेश बनावट आहेत, व त्यातून आर्थिक फसगत होऊ शकते, असे स्पष्टीकरण महावितरणने दिले आहे. तसेच नागरिकांना काही शंका अथवा तक्रार असल्यास वीज ग्राहकाकंनी 1912, 1800-102-3435 किंवा 1800-233-3435 या टोलफ्री क्रमांकावर किंवा नजीकच्या कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहनही महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
कोण पाठवतंय मेसेज?
महावितरणच्या नावानं हे संदेश कोण पाठवतंय, याचा शोध घेतला पाहिजे, अशी मागणी ग्राहकांमधून होतेय. बनावट एसएमएस पाठवणाऱ्यांना शोध महावितरणनेच घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, असे ग्राहकांचे म्हणणे आहे.