Aurangabad | राऊतांसाठी Sharad Pawar मोदींना भेटले, नवाब मलिकांसाठी का नाही? खा. इम्तियाज जलील यांचा सवाल
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केली होती. मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्राधार दाऊद याच्याशी संबंधित व्यक्तींशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत
औरंगाबाद | संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात ईडीची कारवाई झाली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पण नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई करून एवढे दिवस झाले, त्यांना तुरुंगात टाकले तरीही मलिकांकडे पवारांचे दुर्लक्ष का, असा थेट सवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी केला आहे. खासदार जलील यांनी औरंगाबादेत टीव्ही9 च्या प्रतिनिधींशी बोलताना असा सवाल केला. संजय राऊत यांच्याकडून शरद पवारांना फायदा आहे आणि नवाब मलिक हे केवळ अल्पसंख्यांक आहेत, म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातंय, असा गंभीर आरोपही खासदार जलील यांनी केला आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर शरद पवार यांनी द्यावं, असं आवाहन खासदार जलील यांनी केलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी एकामागून एक अशा आघाडी सरकारच्या मंत्र्यांविरोधात धाडसत्र सुरु केल्यानंतर अवघा महाराष्ट्र ढवळून निघत आहेत. भाजपाच्या विरोधात बोलणाऱ्यांवर या कारवाया होत असल्याचा महाविकास आघाडी सरकारचा आरोप आहे.
अल्पसंख्यांक असल्याने मलिकांकडे दुर्लक्ष?
संजय राऊतांवर ईडीची कारवाई झाल्यानंतर काहीच दिवसात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पण नवाब मलिकांवर झालेल्या कारवाईवरून पवारांनी अशी प्रतिक्रिया दिली नाही. संजय राऊत फायद्याचे आणि नवाब मलिक फायद्याचे नाहीत म्हणून भेटला नाहीत का, असा सवाल खासदार इम्तियाज जलील यांनी केला. नवाब मलिक अल्पसंख्यांक असल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही खासदार जलील यांनी केला आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर शरद पवार यांनी द्यावं, असं आवाहन खासदार जलील यांनी केलं आहे.
मलिक आणि राऊतांवर काय कारवाई?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केली होती. मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्राधार दाऊद याच्याशी संबंधित व्यक्तींशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. 18 एप्रिलपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. मलिक यांच्यावरील आरोप सूडबुद्धीने केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केले आहेत. तर ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा चुकीचा आहे, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी दिला आहे. मात्र मलिक यांच्या जामिनासाठी कोर्टात वारंवार अर्ज केला जात आहे. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवरही ईडीने 5 एप्रिल रोजी कारवाई केली. राऊत यांच्या अलिबागमधील जमिनीचे आठ तुकडे आणि दादरमधील एक फ्लॅट जप्त करण्यात आला आहे. पत्राचाळ जमीन घोटाळ्यासंदर्भात ही कारवाई केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्यावरील कारवाई ही अन्यायकारक आहे, असं म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.
इतर बातम्या-