Aurangabad | 15 दुरुस्त्यांसह महापालिकेचा अंतिम प्रभाग रचना आराखडा सादर, मतदार याद्यांच्या कामाला वेग
निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार, मतदार याद्यांचे प्राथमिक काम सुरु झाले आहे. यंदा प्रभागाच्या अनुषंगाने प्रत्येक प्रभागासाठी एकच मतदार यादी तयार करावी लागणार आहे.
औरंगाबादः राज्यातील सत्तांतराच्या नाट्यानंतर मनपा निवडणुकांकडे (Municipal Election) सर्वांचं लक्ष लागलं आहे. औरंगाबाद महापालिकेची (Aurangabad corporation) निवडणूक पहिल्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये होणार नसली तरीही निवडणूक प्रक्रियेची कामं इथेही वेगात सुरु आहेत. महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या प्रभाग आराखड्यावर 324 नागरिकांनी आक्षेप घेतला होता. त्यात 15 प्रमुख दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. आता मनपा प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा निवडणूक आयोगाकडे (Election Commission) सादर करण्यात आल्याची माहिती मनपाच्या निवडणूक विभागाने दिली आहे.
यंदा 126 वॉर्ड, 42 प्रभाग
औरंगाबाद महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल 2020 मध्ये होणार होती. मात्र कोरोना संकटामुळे निवडणूक लांबणीवर पडली. आता राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्यासाठी तयारी सुरु केली आहे. त्यानुसार, आयोगाच्या आदेशानुसार, महापालिका प्रशासनाने प्रभाग रचनेचा नवीन प्रारुप आराखडा तयार करून तो प्रसिद्ध केला होता. महापालिकेची आगामी निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग रचना पद्धतीने घेतली जाणार आहे. म्हणजेच एकेका प्रभागातून तीन-तीन सदस्य निवडले जातील. त्यानुसार महापालिकेने शहरात 126 वॉर्डांचे 42 प्रभाग केले आहेत. हा प्रारुप आराखडा 2जून रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता.
आराखड्यात 15 दुरुस्त्या
2 जून रोजी मनपाचा प्रभाग रचनेचा नकाशा प्रसिद्ध करण्यात आला. 16 जूनपर्यंत हरकती-सूचना मागवण्यात आल्या. 22 जून रोजी औरंगाबादेत मौलाना आझाद संशोधन केंद्रात सुनावणी घेण्यात आली. यासाठी नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी 324आक्षेपांची सुनावणी घेतली. प्रभागांच्या हद्दींची पाहणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देशन त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी केली. दोनच प्रभागांच्या हद्दींबद्दल तसे आक्षेप होते. त्यामुळे त्या प्रभागांची तर स्थळ पाहणी करण्यात आली. त्यानंतरचा अहवालही हर्डीकर यांना सादर करण्यात आला. प्रभाग आराखड्यात एकूण 15 दुरुस्त्या हर्डीकर यांनी सुचवल्या. त्यानंतर हा अंतिम प्रभाग आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला.
मतदार याद्यांचे काम सुरु
निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार, मतदार याद्यांचे प्राथमिक काम सुरु झाले आहे. यंदा प्रभागाच्या अनुषंगाने प्रत्येक प्रभागासाठी एकच मतदार यादी तयार करावी लागणार आहे. त्यामुळे महापालिकेतील निवडणूक विभागाला बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. एका प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात जाणार नाहीत, याची खबरदारीही घ्यावी लागेल.