Eknath Shinde | औरंगाबादच्या वाट्याला तीन मंत्रिपदं? शिवसेनेचं वजन वाढणार, तितकीच गटबाजीही! फायदा भाजपला?

| Updated on: Jul 01, 2022 | 2:19 PM

राजकीय सूत्रांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, सत्तार, भुमरे आणि शिरसाट यांना मंत्रीपदं मिळाली तर औरंगाबादेत एकूण पाच मंत्री होतील.

Eknath Shinde | औरंगाबादच्या वाट्याला तीन मंत्रिपदं? शिवसेनेचं वजन वाढणार, तितकीच गटबाजीही! फायदा भाजपला?
Follow us on

औरंगाबादः एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची वर्णी मुख्यमंत्रीपदी लागल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांच्या (Rebel MLA) वाट्यालाही चांगली मंत्रिपदं येणार अशी चर्चा आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून शिंदेंसोबत पाच शिवसेना आमदार (Shivsena MLA) गेले असून त्यांचीही खाते वाटपात लॉटरी लागणार अशी चर्चा आहे. यापैकी तिघांना मंत्रीपदं मिळणार तर उर्वरीत दोघांना राज्यमंत्री पद मिळणार अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. शिंदेगटात गेलेल्या आमदारामुळे औरंगाबादेत शिवसेने अंतर्गतच दोन गट पडले आहेत. बंडखोरांविरोधात अनेकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी रोष व्यक्त केला आहे. तर अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे यांच्या समर्थकांच्या त्यांच्या मतदार संघात समर्थनासाठी रॅलीही काढली होती. आता एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यामुळे नवी शिवसेना विरोधात जुनी शिवसेना असे दोन गट पडण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये हा वाद अधिक उफाळून येईल आणि याचा फायदा भाजपाला होईल, अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सहापैकी पाच शिंदेंसोबत

औरंगाबाद जिल्ह्यातील 9 आमदारांपैकी 6 आमदार शिवसेनेचे आहेत. त्यापैकी पाच आमदार एकनाथ शिंदेंच्या गटात शामील झाले आहेत. यात पैठणचे आमदार संदीपान भुमरे, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार, वैजापूरचे रमेश बोरनारे, औरंगाबाद पश्चिमचे संजय शिरसाट तर औरंगाबाद मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल यांचा समावेश होते. तर कन्नडचे एकमेव आमदार उदयसिंह राजपूत हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत. ठाकरे सरकारमध्ये मंत्री राहिलेले संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार यांच्यासोबत संजय शिरसाट यांनाही नव्या शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मंत्र्यांचे आतापर्यंत पडद्याआड असलेले समर्थकही पुढे येऊ शकतात. या समर्थकांशीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांना फाइट द्यावी लागेल. मुंबई महापालिकेनंतर औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र शिवसैनिकांमध्ये उफाळून आलेल्या बंडाळीमुळे येथील आगामी निवडणुकीतही भाजपच्या खेळीपुढे शिवसेनेचा कस लागणार आहे.

… तर औरंगाबाद मंत्र्यांचा जिल्हा

राजकीय सूत्रांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, सत्तार, भुमरे आणि शिरसाट यांना मंत्रीपदं मिळाली तर औरंगाबादेत एकूण पाच मंत्री होतील. आधीच भाजपचे डॉ. भागवत कराड हे केंद्रीय अर्थराज्यमंत्री आहेत. तर रावसाहेब दानवे हे रेल्वे राज्य मंत्री आहेत. जालन्याचे असले तरीही रावसाहेब दानवे हे औरंगाबादचेच मानले जातात. औरंगाबादच्या जलाक्रोश मोर्चात त्यांनी घेतलेला पुढाकार सर्वांनीच पाहिलाय. त्यामुळे एकनाथ शिदेंच्या मंत्रीमंडळात औरंगाबादच्या आमदारांना स्थान मिळालं तर शहराचं राजकीय वजन निश्चितच वाढेल. शिवाय रखडलेल्या योजना पूर्णत्वास येण्यास मदत होईल, अशी आशा जनतेला आहे.