Samruddhi Highway Accident : लहान मुलांची खेळणी, सामान रस्त्यावर… ‘समृद्धी’वरील अपघातात 12 ठार, सैलानीच्या भाविकांवर काळाचा घाला
संभाजी नगरमध्ये आज सकाळी समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. खासगी बस आणि ट्रक दरम्यान हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात काही भाविकांचा मृत्यू झाला असून वारंवार होणाऱ्या अपघातामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
दत्ता कानवटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, संभाजीनगर | 15 ऑक्टोबर 2023 : समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका काही थांबताना दिसत नाही. या महामार्गावर वारंवार अपघात होत असून अनेकांचे जीव जात आहेत. अनेकजण जखमी होऊन जायबंदी होत आहेत. वारंवार अपघात होऊनही या ठिकाणी कोणतीही उपाययोजना केली जात नाही. मध्यंतरी झालेल्या भीषण अपघातानंतर सरकारने समृद्धी महामार्गावर अनेक उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. मात्र, पुढे काहीही घडल्याचं दिसत नाही. कारण संभाजीनगर येथे समृद्धी महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात झाला असून या अपघातात 12 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 20 ते 22 जण जखमी झाले आहेत.
रात्री 12.30 ते 12.45 वाजता संभाजीनगरच्या वैजापूरजवळील आगर सायगाव येथे हा भीषण अपघात झाला. समृद्धी महामार्गावर एक ट्रक थांबलेला होता. पाठीमागून आलेल्या भरधाव खासगी बसने या बसला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बस दूरवर जाऊन उलटी झाली. या अपघातात बसमधील 12 प्रवाशी ठार झाले, तर 20 ते 22 प्रवाशी जखमी झाले. जखमींना संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघात अत्यंत भीषण होता. अपघातामुळे बसचा चक्काचूर झाला. इतकेच नव्हे तर बसमधील सीट, बसमधील प्रवाशांचे सामान, लहान मुलांची खेळणी सर्व काही रस्त्यावर येऊन पडले. सर्व काही अस्तव्यस्त झालं.
12 प्रवाशी ठार
ही बस बुलढाण्याहून येत होते. सैलानीला गेलेल्या भाविकांना ही खासगी बस येत होती. बसमध्ये 30 ते 35 प्रवासी होते. त्यावेळी समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन ही बस आदळली. त्यामुळे बस उलटून हा भीषण अपघात झाला. या अपघातात 12 प्रवाशांसह एका बालकाचाही मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच आधी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मदतकार्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मदतकार्य करतास पंचनामा करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
आरटीओने ट्रक थांबवला
समृद्धी महामार्गावर आरटीओच्या अधिकाऱ्यांनी हा ट्रक थांबवला होता. त्यामुळे पाठीमागून आलेली खासगी बस ट्रकवर आदळल्याचं सांगितलं जातं. समृद्धी महामार्गावर कोणतंही वाहन अडवण्याची परवानगी नाही. असं असताना आरटीओच्या अधिकाऱ्यांनी ट्रक अडवून रस्त्याच्या कडेला थांबवला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. हा ट्रक अधिकाऱ्यांनी थांबवला नसता तर अपघात झालाच नसता असं सांगितलं जात आहे.