हातात धान कापणीचं अवजार अन् समोर डरकाळी फोडणारा वाघ, गडचिरोलीत 44 वर्षांच्या वाघिणीची यशस्वी झुंज!
गडचिरोली जिल्ह्यात वाघाची दहशत कायम असून शेतात काम करणारे मजून दर दिवसाला वाघाच्या दहशतीखाली काम करतात. सोमवारी एका शेतमजूर महिलेवर वाघानं असाच हल्ला केला, मात्र त्या धाडसी महिलेनं मोठ्या हिंमतीनं हा हल्ला परतवून लावला.
मोहम्मद इरफान, गडचिरोलीः जिल्ह्यात सध्या वाघाची आणि बिबट्याची (Tiger attack) प्रचंड दहशत माजली आहे. त्यातच देसाईगंज अरमोरी चार्मोशी (Gadchiroli Forest) तालुक्यात तर वाघाने धुमाकूळ घातला आहे. याच तालुक्यातील मुरमुरी गावात सकाळी शेतात काम करण्यासाठी गेलेल्या मजुरांवर वाघानं हल्ला केला. या हल्ल्यानं घाबरून न जाता, अत्यंत जिगरबाजपणानं हातात जे शस्त्र आहे, त्यानेच वाघाचा हल्ला परतवून लावण्याची कामगिरी 44 वर्षांच्या सरीताबाईंनी केलीय.
हातात होतं धान कापणीचं शस्त्र
साधारण पाचशे-सहाशे लोकवस्ती असलेल्या मुरमुरी गावातील बहुतांश लोक शेतीवर गुजराण करतात. सोमवारी दुपारी गावातील शेतकरी आणि शेतमजूर कामासाठी शेतावर गेलेले होते. यात 44 वर्षांच्या सरीता देवाजी चहाकटे यादेखील होत्या. शेताच्या बाजूलाच असलेल्या घनदाट जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाची त्यांना कल्पनाही नव्हती. हातातल्या धान कापणीनं त्यांचं धान कापणीचं काम सुरु होतं. अचानक समोरून डरकाळी फोडणारा वाघ दिसला. शेतात इतर शेतमजूर होते पण ते काही अंतरावर होते. वाघासमोर एकट्याच सरिताबाई. या क्षणाला घाबरून न जाता त्यादेखील वाघावर तुटून पडल्या. समोरून हल्ला करणाऱ्या वाघावर सरिताताईंनी हातातल्या धान कापणीनं हल्ला चढवा. सोबत आरडाओरडही सुरु केली. अखेर आजूबाजूच्या शेतातले लोक समा झाले. त्यांनीही जमेल ते शस्त्र, लाठ्या, काठ्या हातात घेऊन या वाघावर हल्लाबोल केला. सरिताबाई आणि शेतकऱ्यांनी मोठ्या जिगरबाजपणे वाघाचा हल्ला परतवून लावला. पण गावात असे हल्ले नेहमीच होत आहेत. कुणा माणसाच्या जीवावर बेततं तर कुणाच्या जनावराचे प्राण जातात. ही दहशत कुठे तरी संपावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.
वाघाला जेरबंद करण्याची गावकऱ्यांची मागणी
मुरमुरी गावात आणि चार्मोशी तालुक्यातही गेल्या काही दिवसांपासून वाघाची दहशत पसरली आहे. वाघानं आतापर्यंत अनेक प्राण्यांवर हल्ला केला आहे. त्यामुळे वन विभागानं ताबडतोब या वाघाला जेरबंद करावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
इतर बातम्या-