औरंगाबादेतील मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण, मनपा एका वर्षात 7 हजार कुत्र्यांचा बंदोबस्त करणार
शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या वाढतच आहे. शहरात आतापर्यंत अंदाजे 50 हजार मोकाट कुत्रे असल्याचे समोर आले आहे.
औरंगाबादः शहरात विविध वसाहतींमधील नागरिकांसाठी त्रासदायक ठरणाऱ्या मोकाट कुत्र्यांचा (Stray Dogs ) बंदोबस्त करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मनपाने निविदा (municipality tender) मागवल्या आहेत. यातून सर्वात कमी दर असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथील अरिहंत वेल्फेअर सोसायटी या खासगी संस्थेची निविदा अंतिम करण्यात आली आहे. या संस्थेला 2021 ते 2024 या तीन वर्षांसाठी काम दिले आहे. या संस्थेच्या माध्यमातून 2021-22 या एका वर्षासाठी 7 हजार कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करणार असून त्याकरिता 50 लाखांचा निधी खर्च करण्यात येणार आहे, अशी माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कुत्र्यांच्या टोळ्यांची नागरिकांमध्ये दहशत
शहरातील काही वसाहतींमध्ये तर रात्रीच्या वेळी कुत्र्यांच्या टोळ्याच फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असते. शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या वाढतच आहे. शहरात आतापर्यंत अंदाजे 50 हजार मोकाट कुत्रे असल्याचे समोर आले आहे. या मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या चौकाचौकात व गल्लीबोळात फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुले, पुरुष, महिला, वयोवृद्ध नागरिक गंभीर जखमी झाले असून लहान मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मनपाने मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी इच्छुक संस्थेच्या ई-निविदा मागवल्या होत्या. परंतु, दोन वेळेस निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. तिसऱ्यांदा चार निविदा प्राप्त झाल्या. यात सर्वात कमी दराची निविदा भूम येथील अरिहंत वेल्फेअर सोसायटी आहे. 2021 ते 2024 तीन वर्षांसाठी खासगी संस्थेशी करार केल्याची माहिती मनपाने दिली आहे.
एका शस्त्रक्रियेसाठी 900 रुपये खर्च
भूमच्या अरिहंत वेल्फेअर सोसायटीसोबत दरनिश्चिती झाली आहे. मोकाट श्वान कर्मचाऱ्यांमार्फत वाहनातून पकडून आणणे, त्या एका श्वानावर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करून पुन्हा त्या ठिकाणी नेऊन सोडणे, याकरिता 900 रुपये खर्च येणार आहे. मनपा वाहन आणि पथकामार्फत पकडून आणलेल्या श्वानावर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यासाठी 700 रुपये, तक्रारीच्या ठिकाणाहून धोकादायक, पिसाळलेल्या व उपचाराअंती दुरुस्त न होऊ शकणाऱ्या श्वानांना सीआरसीयूच्या नियंत्रणाखाली दयामरण देणे 65 रुपये, आजारी श्वान पिल्ले पकडून आणणे, उपचार, देखभाल करून त्याच ठिकाणी पुनर्वसन करणे 70 रुपये. याप्रमाणे दर निश्चित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
इतर बातम्या-