औरंगाबादेत अवघ्या 15 दिवसाच्या बाळाला किडनीचा दुर्मिळ आजार, शस्त्रक्रियेने मिळाले जीवदान
5 टक्के नवजात शिशूंमध्ये किडनीचा आजार आढळतो. त्याकडे दुर्लक्ष केल्यास गुंतागुंत वाढत जाते. अगदी प्राणावरही बेतू शकते. म्हणून लघवी थांबली. सतत ताप येत असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
औरंगाबाद: जन्मल्यानंतर दुर्मिळ अशा किडनीच्या आजाराचा (kidney disease) सामना करणाऱ्या 15 दिवसाच्या बाळावर शहरातील रुग्णालयात अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर या बाळाचे प्राण वाचले. अशा प्रकारची शस्त्रक्रिया प्रथमच करत असल्याने रुग्णालयातील डॉक्टरांसमोरही मोठे आव्हान होते. मात्र औरंगाबाद येथील बजाज रुग्णालयातील (Bajaj Hospital, Aurangabad) तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने अत्यंत काळजीपूर्वक ही केस हाताळून बाळाला जीवदान दिले आहे.
किडनीवर 5 सेमी सूज, डॉक्टरांसाठी होते आव्हान
अवघ्या पंधरा दिवसांचे बाळ. अचानक ताप येऊ लागला. सोबत लघवीही थांबली. त्यामुळे ते सारखे रडू लागले. घाबरलेल्या मातापित्यांनी तत्काळ कमलनयन बजाज रुग्णालयात धाव घेतली. तीन किलोच्या वजन असलेल्या या बाळाच्या किडनीवर पाच सेंटिमीटर सूज होती. त्याला वैद्यकीय भाषेत ‘जायंट हायड्रोनेफ्रोसिस’ म्हणतात. औषधी देऊन सूज कमी होणार नव्हती. म्हणून तत्काळ शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. मात्र, रात्री तब्येत जास्तच बिघडल्याने बाळाला व्हेंटिलेटर लावावे लागले. त्या अवस्थेत शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. त्रासही पहावत नव्हता. मग बाळाच्या किडनीत नळी टाकून तात्पुरता उपचार केला. त्याची प्रकृती स्थिर होण्यास साधारणतः दोन आठवडे लागले. आता तो शस्त्रक्रिया सहन करू शकेल, असे दिसल्यावर किडनीतील ब्लॉक काढला.
गर्भातच असताना होती किडनीवर सूज
१५ दिवसांच्या नवजात शिशूला घेऊन पालक रुग्णालयात आले. बाळ दूध पीत नाही. त्याला ताप येतो आणि ते सारखे रडते, अशी त्यांची तक्रार होती. आम्ही सखोल माहिती घेतली. जन्मापूर्वी त्याची वाढ कशी झाली, याची कागदपत्रे तपासली. तेव्हा बाळ गर्भात असतानाच त्याच्या किडनीवर सूज आहे, असे सोनोग्राफीमध्ये निदान झाले होते. मग मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. आदित्य येळीकर यांचा सल्ला घेत सीटी स्कॅनद्वारे बाळाची पुन्हा अत्यंत बारकाईने तपासणी केली, अशी माहिती बजाज’चे बालरोगतज्ज्ञ डॉ. राहुल गोसावी यांनी दिली. दरम्यान, डाॅक्टरांनी वेळीच याेग्य उपचार केल्याने आमचे बाळ वाचले, असे त्याच्या वडिलांनी सांगितले.
प्रथमच अशी शस्त्रक्रिया
डॉ. गोसावी यांनी सांगितले की, इतक्या छोट्या शिशूवर अशा प्रकारची शस्त्रक्रिया प्रथमच करण्यात आली. डॉक्टरांची टीमही चिंतेत होती. मात्र, मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. आदित्य येळीकर यांच्यासह बालरोगतज्ज्ञ डॉ. निखिल पाठक, डॉ. प्रसाद, डॉ. मुंदडा, भूलतज्ज्ञ, शिशू अतिदक्षता विभागातील नर्सिंग स्टाफच्या प्रयत्नांमुळे यश मिळाले. एका बाळाला जीवदान मिळाले. रुग्णालयाचे चेअरमन सी. पी. त्रिपाठी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. नताशा वर्मा, वैद्यकीय संचालक डॉ. मिलिंद वैष्णव यांनी टीमचे अभिनंदन केले.
5 टक्के बाळांमध्ये आजार
5 टक्के नवजात शिशूंमध्ये किडनीचा आजार आढळतो. त्याकडे दुर्लक्ष केल्यास गुंतागुंत वाढत जाते. अगदी प्राणावरही बेतू शकते. म्हणून लघवी थांबली. सतत ताप येत असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यातून पुढचा अनर्थ टळू शकतो, अशी माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. राहुल गोसावी यांनी दिली.
इतर बातम्या-
औरंगाबाद जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम सुरु, 25 ऑक्टोबरपर्यंत चालणार सर्वेक्षण
लसींचे 95 हजार डोस शिल्लक, नागरिकांनी पुढे येण्याची गरज, जनजागृतीसाठी औरंगाबाद मनपाचे व्यापक प्रयत्न