आता डेंग्यूचाही वेगळा व्हेरिएंट, औरंगबाादेत रुग्णसंख्येत अचानक वाढ, ताप अंगावर काढू नका
जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत 104 रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकट्या सप्टेंबर महिन्यातील रुग्णांची संख्या 77 एवढी आहे.
औरंगाबाद: सततच्या बदलणाऱ्या कोरोना विषाणूच्या व्हेरिएंटमुळे जगभरातील आरोग्य तज्ज्ञांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. यातच आता डेंग्यूच्या विषाणूतही बदल (New verient in Dengue) दिसून येत असल्याचा इशारा देण्यात आल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील आरोग्ययंत्रणा (Health system in Aurangabad) खडबडून जागी झाली आहे. रुग्णाच्या शरीरात डेंग्यूची लक्षणे आढळून येत असली तरीही डेंग्यूची चाचणी मात्र निगेटिव्ह येत आहे. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञही गोंधळून गेले आहेत. दरम्यान, शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला सततचा पाऊस, विविध कॉलन्यांमध्ये सुरु असलेली रस्त्याची कामे यामुळे घरांभोवती पाणी साचलेले आहे. अशा वेळी डासांपासून रक्षण तरी कसे करावे, हा पेच नागरिकांसमोर आहे.
सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक वाढ
मागील 8 महिन्यांच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची सर्वाधिक वाढ झाली आहे. लहान मुलांपासून मोठ्या माणसांमध्येही ताप आणि अंगदुखीची लक्षणे जाणवत आहेत. जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत 104 रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकट्या सप्टेंबर महिन्यातील रुग्णांची संख्या 77 एवढी आहे. आतापर्यंत 260 जणांच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. हे आकडे फक्त शासकीय रुग्णालयात नोंद झालेले असून खासगी रुग्णालयांतील रुग्णांची संख्या आणखी जास्त आहे. त्याामुळे डेंग्यूच्या रुग्णांची आकडेवारी निश्चितच चिंता वाढवणारे आहेत.
डेंग्यूचे चार प्रकार
डेंग्यू हा डासांपासून पसरणारा विषाणूजन्य गंभीर आजार आहे. डी1, डी 2, डी 3 आणि डी 4 या चार डेंग्यूच्या विषाणूंमुळे शरीरात ताप उद्भवतो. या चारही प्रकारच्या तापांचे गुणधर्म सारखेच असतात. सध्या व्हायरल फीवरची साथ सुरु आहे. इलायझा या चाचणीद्वारे डेंग्यूचे निदान केले जाते. एनएस-1 अँटिजन आढळून आल्यास डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट होते. रॅपिड टेस्ट ही कोणत्याही व्हायरल फिवरमध्ये पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असते.
टेस्ट निगेटिव्ह, पण लक्षणे डेंग्यूचीच
औरंगाबादमधील शासकीय रुग्णालयात दाखल होणाऱ्या अनेक रुग्णांमध्ये डेंग्यूसारखीच लक्षणे दिसून येत आहेत. परंतु डेंग्यूची चाचणी केली असता त्याचा अहवाल निगेटिव्ह येत आहे. रुग्णाच्या शरीरारीत प्लेटलेटचे प्रमाण कमी होणे, खूप ताप येणे, अंगावर चट्टे येणे, थंडी वाजून येणे आदी लक्षणे दिसून येत आहेत, अशी माहिती घाटी रुग्णालयातील मेडिसीन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी दिली.
मुलांची जास्त काळजी घेण्याची गरज
डेंग्यूचा ताप पाच ते सहा दिवसात गेला नाही तर हा आजार गांभीर्याने घेण्याची गरज आहे. सध्या दहा ते पंधरा वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये डेंग्यू काहीसे गंभीर रुप घेत आहे. त्यामुळे लहान मुलांची विशेष काळजी घेणे, त्यांना डासांपासून दूर ठेवणे गरजेचे आहे. डेंग्यूच्या रुग्णांमध्ये नेहमीपेक्षा वेगळी लक्षणे जाणवत आहेत. त्यामुळे सर्दी, खोकला नाही म्हणून तापेकडे दुर्लक्ष करून घरीच वाट न पाहण्याचे आवाहन बालरोगतज्ज्ञ, डॉ. अभय जैन यांनी केले आहे.
इतर बातम्या-
Health Tips : हे पदार्थ गुडघे आणि पाठदुखीची समस्या दूर करण्यास मदत करतात, वाचा याबद्दल अधिक!
Health Tips : निरोगी आरोग्यासाठी बडीशेप युक्त दूध प्या आणि रोगांना दूर ठेवा!