औरंगाबादेत श्वानांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी, पडेगावात एक एकर जागेवर प्रकल्प
महापालिकेच्या वतीने शहरात श्वानांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी तयार करण्यात येत आहे. त्यासाठी पडेगाव येथे एक एकर जागा देण्यात आली आहे. त्याच ठिकाणी हिंस्र कुत्र्यांसाठी कोंडवाडादेखील उभारला जाणार आहे.
औरंगाबाद: कुत्रा हा माणसाप्रति सर्वात इमानदार आणि प्रेमळ प्राणी म्हणून ओळखला जातो. पाळीव प्राण्यांची हौस असणाऱ्यांच्या घरातील श्वान हा त्या कुटुंबातील जणू सदस्यच असतो. तसेच शहरात, नागरी वसतींमध्ये फिरणारे भटके कुत्रेही अनेकदा कॉलनीच्या रक्षणकर्त्याची भूमिका निभावतात. त्यामुळे माणसाचा एक अगदी जवळचा, प्रामाणिक प्राणी म्हणून त्यांची अखेरपर्यंत योग्य काळजी घेण्याच्या उद्देशाने औरंगाबाद महापालिकेतर्फे (Aurangabad Municipal corporation) लवकरच श्वानांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी तयार केली जाणार आहे. पडेगाव (Padegoan ) येथील एक एकर जागेत हा प्रकल्प उभा राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
स्मशानभूमीसोबत कोंडवाडाही उभारणार
महापालिकेच्या वतीने शहरात श्वानांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी तयार करण्यात येत आहे. त्यासाठी पडेगाव येथे एक एकर जागा देण्यात आली आहे. त्याच ठिकाणी हिंस्र कुत्र्यांसाठी कोंडवाडादेखील उभारला जाणार आहे. या कामासाठी 75 लाख रुपये खर्चाची निविदा काढण्यात आली आहे.
शहरात अंदाजे 40 हजार कुत्री
औरंगाबाद महापालिकेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात अंदाजे 40 हजार कुत्री आहेत. मात्र त्यांची विल्हेवाट लावण्याची अशी खास व्यवस्था नाही. अनेकदा मृत झालेली कुत्री दूर नेऊन फेकली जातात. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे त्यांच्या विल्हेवाटीसाठी स्वतंत्र जागा असावी, असा प्रस्ताव पुढे आला आणि त्यातूनच हा प्रकल्प उभा राहणार आहे.
कुत्र्यांना जीवे मारणे हा गुन्हा
अनेकदा विविध कॉलनींमधून महापालिकेला भटक्या कुत्र्यांविरोधात तक्रार केली जाते. ही कुत्री उचलून घेऊन जा म्हटले जाते. मात्र नागरिकांसाठी त्रासदायक ठरणाऱ्या या कुत्र्यांचे नेमके करायचे काय, असा प्रश्न महापालिकेसमोर असतो. नियमानुसार फक्त पिसाळलेल्या कुत्र्यांनाच, काहीही उपचार होत नसतील तेव्हा जीवे मारण्याचा अधिकार महापालिकेला असतो. मात्र इतर कुत्र्यांना जीवे मारता येत नाही. त्यामुळे या कुत्र्यांचे करायचे काय हा प्रश्न महापालिकेसमोर होता.
स्मशानभूमीच्या बाजूलाच कोंडवाडा उभारणार
शहरातील रहिवाशी वस्त्यांमध्ये त्रासदायक ठरणाऱ्या किंवा माणसांवर हल्ले करणाऱ्या कुत्र्यांसाठी पडेगाव येथील प्रकल्पातच एक कोंडवाडा उभा केला जाणार आहे. कारण अशा कुत्र्यांना ठेवण्यासाठी कोणतीही व्यवस्था महापालिकेकडे नव्हती. आता मनपाने पडेगाव येथील कचरा डेपोच्या बाजूला एक एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. याच ठिकाणी हिंस कुत्र्यांना ठेवण्यासाठी कोंडवाडी उभारला जाणार आहे. दोन्ही कामांवर एकूण ७५ लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. त्यांची निविदाही नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. स्मशानभूमीच्या कामाची निविदा लवकरच पूर्ण होऊन कामाला सुरुवात होईल, असे महापालिकेचे प्रभारी मुख्य पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शाहेद शेख यांनी सांगितले.
इतर बातम्या-
Aurangabad: 1 ऑक्टोबरपासून बिलावर हवा परवाना क्रमांक, खाद्यपदार्थ विकत घेताना बाळगा सावधगिरी