औरंगाबादकरांनो खबरदार! पॉझिटिव्ह आलेले गर्दीत फिरून गेले, मास्क टाळू नका! तुम्हीही संपर्कात येऊ शकता
गेल्या आठवड्यात मनपा परिसरात आढळलेल्या 27 रुग्णांपैकी 8 जणांना प्रवासातून कोरोनाची लागणी झाली आहे. यातील चार जण बीडहून तर तीन जण पुणे, नगर, बुलडाण्यातून प्रवास करून आले होते.
औरंगाबादः कोरोना संसर्गाचे (Corona) प्रमाण कमी झाल्यामुळे यंदाची दिवाळी अधिक उत्साहाने साजरी करण्याच्या तयारीत अनेक जण आहेत. याच उत्साहात स्वतःची काळजी घेण्याचे भान प्रत्येकाने ठेवावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. कारण जिल्ह्यात मागील आठवडाभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत हळू हळू वाढ होताना दिसत आहे. त्यातही पॉझिटिव्ह रुग्णांच्या (Corona Pocsitive) संपर्कात म्हणजेच हायरिस्कमध्ये असलेल्या 55 जणांपैकी 7 जणांनी अद्याप चाचणी केली नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे सणासुदीचा आनंद लुटतानाच नागरिकांनी अधिक सतर्क राहून नियमांचे पालन करावे, वारंवार गर्दीत जाणे टाळावे, असे आवाहन औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण (Collector Sunil Chavan) यांनी शुक्रवारी केले.
बेफिकिरी वाढली अन् रुग्णांची संख्याही वाढली
औरंगाबाद जिल्ह्यात मागील चार महिन्यांपासून नियंत्रणात असलेली कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढू लागली आहे. सध्याच्या उत्सवी वातावरणामुळे सर्वत्र गर्दी वाढली आहे. नागरिकांमध्ये बेफिकिरीचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे 23 ते 27 ऑक्टोबर या कालावधीत मनपा हद्दीत केलेल्या कोरोना चाचण्यांमध्ये 27 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
अतिजोखीमीत 55, पैकी 49 जणांच्या चाचण्या, 6 चाचण्या नाहीच
गेल्या आठवड्यातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 55 लोकांपैकी 49 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 5 जणांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. उर्वरीत 6 जणांनी अद्यापही चाचण्या केलेल्या नाहीत. सध्या दिवाशी सणानिमित्त बाहेर पडलेले अनेकजण मास्कशिवाय फिरत आहेत. त्यांच्यासाठी तसेच त्यांच्यामुळे इतर शहरवासियांसाठी हे धोकादायक ठरू शकते, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
पॉझिटिव्ह आलेले कोण कोण होते?
– गेल्या आठवड्यात मनपा परिसरात आढळलेल्या 27 रुग्णांपैकी 8 जणांना प्रवासातून कोरोनाची लागणी झाली आहे. यातील चार जण बीडहून तर तीन जण पुणे, नगर, बुलडाण्यातून प्रवास करून आले होते. – एक विद्यार्थी जळगाव येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील साई येथे प्रवेशासाठी आला होता. असे आठजण पॉझिटिव्ह आढळले आहेत. – एका शाळेतील शिक्षकाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. – एका सुरक्षारक्षकाच्या आईला, एसटी विभागातील लिपिकाच्या पत्नीला व प्रोझोन मॉलमधील एका मुलाला व शिकवणीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याला कोरोना झाल्याचे उघड झाले. – तसेच गुलमंडीत खरेदीसाठी गेलेल्या आणि कर्णपुऱ्यात दर्शनासाठी गेलेल्या तिघांना कोरोना झाल्याचे मागील आठवड्यात उघड झाले. – दरम्यान रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 7 जणांची माहिती अद्याप मिळालेली नाही.
शुक्रवारी शहरात 9, ग्रामीण भागात 5 रुग्णांची भर
जिल्ह्यात शुक्रवारी 14 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. उपचार पूर्ण झालेल्या 11 जणांना सुटी देण्यात आली आहे. मनपाच्या हद्दीत 9 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले तर ग्रामीण भागात 5 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
इतर बातम्या
अतिक्रमणाच्या विळख्यातून पैठण गेटची मुक्तता, औरंगाबाद महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाची कारवाई
ऐकावं ते नवलंच! औरंगाबादेत प्रियकरानेच फोडले प्रेयसीचे घर, म्हणे धडा शिकवण्यासाठी केली चोरी..